भाजपचे 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर; या यादीतच दडलेत उमेदवार

भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास...

BJP : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजप (BJP) अॅक्शन मोडमध्ये आला असून नेते मंडळींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्याही आधी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत येऊन एक वर्ष होईल. त्यात आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. जागावाटपावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. तरी देखील नेते मंडळी आपापल्या परीने जागांवर दावा ठोकत आहेत. पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, येथे कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याचा आढावा घेतला जात आहे.

मोहोळ यांची नावाची चर्चा पण..

या घडामोडी सुरू असतानाच भाजपने आघाडी घेत निवडणूक प्रमुख नेमले आहेत. कदाचित हेच निवडणूक प्रमुख आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पुणे लोकसभेची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बारामती मतदारसंघात आमदार राहुल कुल यांच्याकडे तर शिरुर लोकसभा मतदारंसघाची जबाबदारी भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे.

मावळमध्ये प्रशांत ठाकूर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, हातकणंगले सत्यजित देशमुख, सांगली दीपक शिंदे, सातारा अतुल भोसले, सोलापूरमध्ये प्रशांत परिचारक यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

माजी महापौर सांभाळणार नगर दक्षिण 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी बाबासाहेब वाकळे यांच्याकडे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची कमान राजेंद्र गोंदकर यांच्या हाती देण्यात आली आहे. अकोला मतदारसंघाची जबाबदारी अनुप धोत्रे यांना दिली आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दित प्रथमच महत्वाच्या पदावर नियुक्ती मिळाली आहे.

संजय धोत्रे आजारी, मुलाकडे आली जबाबदारी 

अकोला हा मतदारसंघ सातत्याने भाजपकडे राहिला आहे. अशा वेळी या बालेकिल्ल्याची जबाबदारी अनुप धोत्रे यांच्याकडे राहणार आहे. संजय धोत्रे या मतदारसंघात 2004 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर तीन वेळेस त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मागील दोन वर्षांपासून ते आजारी आहेत. म्हणून आता भाजपने त्यांच्या मुलावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.

अशी आहे यादी 

योगेश सागर (मुंबई उत्तर), अमित साटम (मुंबई उत्तर पश्चिम), भालचंद्र शिरसाट (मुंबई उत्तर पूर्व), पराग अळवणी (मुंबई उत्तर मध्य), प्रसाद लाड (मुंबई दक्षिण मध्य), मंगलप्रसाद लोढा (मुंबई दक्षिण), विनय सहस्त्रबुद्धे (ठाणे), मधुकर मोहपे (भिवंडी), शशिकांत कांबळे (कल्याण), नंदकुमार पाटील (पालघर), प्रशांत ठाकूर (मावळ), सतीश धारप (रायगड), प्रमोद जठार (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), धनंजय महाडिक (कोल्हापूर), सत्यजित देशमुख (हातकणंगले), दीपक शिंदे (सांगली), अतुल भोसले (सातारा), विक्रम देशमुख (सोलापूर), प्रशांत परिचारक (माढा), नितीन काळे (धाराशिव), दिलीप देशमुख (लातूर), राजेंद्र म्हस्के (बीड), व्यंकटेश गोजेगावकर (नांदेड), समीर राजूरकर (छत्रपती संभाजीनगर), विजय औताडे (जालना), रामप्रसाद बोर्डीकर (परभणी), रामराव वडकुते (हिंगोली), केदा आहेर (नाशिक), बाळासाहेब सानप (दिंडोरी), राजेंद्र गोंदकर (शिर्डी), बाबासाहेब वाकळे (नगर दक्षिण), राधेश्याम चौधरी (जळगाव), नंदू महाजन (रावेर), राजवर्धन कदमबांडे (धुळे), तुषार रंधे (नंदूरबार), जयंत डेहनकर (अमरावती), नितीन भुतडा (यवतमाळ- वाशिम), विजय शिंदे (बुलढाणा), अनुप धोत्रे (अकोला), सुमित वानखेडे (वर्धा), प्रविण दटके (नागपूर), अरविंद गजभिये (रामटेक), किसन नागदेवे (गडचिरोली), प्रमोद कडू (चंद्रपूर), विजय शिवनकर (भंडारा-गोंदिया), मुरलीधर मोहोळ (पुणे), राहुल कुल (बारामती), महेश लांडगे (शिरुर)

Tags

follow us