देवेंद्र फडणवीसांचा एक आदेश अन् 50 हजारांहून अधिक महिला सरपंचांना टार्गेट करणारे रॅकेट उघड!
Women Sarpanch Extortion Racket: महिला सरपंच, ग्रामसेवकांना फोन करून पैसे उकळणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला.
Nagpur Police Bust Women Sarpanch Extortion Racket: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून पैसे उकळणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जाहिरातीच्या नावाखाली पैशांची मागणी करायची आणि पैसे देण्यास नकार दिल्यास ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्याची धमकी द्यायची, अशी या टोळीची पद्धत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे महिला सरपंचांनी तक्रार केल्यानंतर फडणवीसांनी नागपूर पोलिसांना या प्रकरणाचे तपास करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळमधून 35 तरुणींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत देशातील 8 राज्यांमधील 50 हजारांहून अधिक महिला सरपंच आणि ग्रामसेवकांची माहिती असलेली 618 रजिस्टरही पोलिसांच्या हाती लागली आहेत.
भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी-शिवसेना सातारा बँकेची सत्ता काबीज करणार? आज निर्णय होणार!
मुख्यमंत्री फडणवीसांसमोर महिला सरपंचांनी मांडली होती तक्रार
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील लोहारी सावंगा गावात आले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध गावांतील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी काही महिला सरपंचांनी ‘श्रेष्ठ न्यूज’ नावाने फोन करून पैसे मागितले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
सुरुवातीला जाहिरातीच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार केला असून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्याची धमकी दिली जात होती. या प्रकारामुळे महिला सरपंच आणि ग्रामसेवक त्रस्त झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते.
भोपाळमध्ये तीन कॉल सेंटरमधून सुरू होता कारभार
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. या तपासातून या टोळीचे धागेदोरे मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत पोहोचले. मोनिका सूर्यवंशी आणि तिची बहीण नेहा सूर्यवंशी या दोघी या टोळीचे नेतृत्व करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
IPL 2027 Retention : मोठ्या खेळाडूंना धक्का ; बोल्ट,स्टार्कसह अनेक दिग्गज खेळाडू रिलीज
भोपाळमधील हर्षवर्धन नगर, निषातपुरा आणि एमपी नगर या तीन ठिकाणी कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. तिथून महाराष्ट्रातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन केले जात होते. जाहिरातीसाठी पैसे मागण्यापासून सुरू झालेला हा प्रकार पुढे खंडणी उकळण्यापर्यंत पोहोचत होता.
‘महापंचायत’ पोर्टलवरून मिळवायचे सरपंचांचे मोबाईल नंबर
या टोळीची काम करण्याची पद्धतही धक्कादायक आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘महापंचायत’ पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून महिला सरपंच आणि ग्रामसेवकांचे मोबाईल नंबर मिळवले जात होते. त्यानंतर त्यांना फोन करून जाहिरातीच्या नावाखाली पैसे मागितले जायचे.
संबंधितांनी पैसे देण्यास नकार दिल्यास टोळीतील सदस्य पोर्टलवरून त्या ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती मिळवत होते. त्यानंतर या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कारवाईची भीती दाखवली जायची. अशा प्रकारे दबाव निर्माण करून पैसे उकळले जात होते.
8 राज्यांतील 50 हजारांहून अधिक सरपंच आणि ग्रामसेवकांची माहिती
नागपूर ग्रामीण पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी भोपाळमधील तिन्ही कॉल सेंटरवर कारवाई केली. यावेळी 35 तरुणींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना तिथे तब्बल 618 रजिस्टर मिळाले. त्यामध्ये देशातील 8 राज्यांतील 50 हजारांहून अधिक महिला सरपंच आणि ग्रामसेवकांचे मोबाईल नंबर तसेच त्यांच्या ग्रामपंचायतींमधील विकासकामांची माहिती नोंदवण्यात आली होती.
जिल्हा बँकेत गुलाबराव पाटलांचा दबदबा; सेनेच्या सहा जागा बिनविरोध; भाजपला किती जागा ?
या कारवाईत पोलिसांनी 54 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 2 संगणक, अनेक प्रिंटर आणि 618 रजिस्टर जप्त केले आहेत. या टोळीने आणखी किती जणांना अशा प्रकारे लक्ष्य केले, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता नागपूर ग्रामीण पोलीस करत आहेत.