नरसिंहरावांच्या पुतळ्याच्या अनावरणास राज्यपालांचा नकार; नव्या वादाची चिन्हे

  • Written By: Published:
नरसिंहरावांच्या पुतळ्याच्या अनावरणास राज्यपालांचा नकार; नव्या वादाची चिन्हे

नागपूर:अनेक कारणांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादात अडकले आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीने आंदोलने केली आहेत. आता पुन्हा राज्यपाल हे एका वादात सापड. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे.

याबाबतचा मुद्दा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात उपस्थित केला. तसेच यावरून त्यांनी सरकारला सवालही उपस्थित केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, येत्या २१ डिसेंबर रोजी रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह नियोजित आहे. याच वेळी विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती. मात्र, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर राज्यपाल येण्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करून घ्या, असेही राज्यपाल कार्यालयाने कळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यापीठाने राज्यपाल येण्याच्या अवघ्या एक दिवस आधी २० डिसेंबर रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते असले तरी ते देशाचे पंतप्रधान होते. देशातील एक उत्तुंग व विद्वान नेते म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदारही राहिले होते. देशाची अर्थव्यवस्था नाजूक असताना त्यांच्या काळात देशामध्ये अनेक महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांनी केले असते तर ते अधिक योग्य ठरले असते, असे सांगून २१ डिसेंबर रोजी कुलपती या नात्याने दीक्षांत समारोहासाठी राज्यपाल विद्यापीठात येत असताना देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण आदल्या दिवशीच उरकून घेण्यामागे नेमके प्रयोजन तरी काय? असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केलाय. त्यावरून आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube