‘आपण सांगून काम करतो’; भुजबळांना धमकी देणारा काय म्हणाला? ऐका सविस्तर

‘आपण सांगून काम करतो’; भुजबळांना धमकी देणारा काय म्हणाला? ऐका सविस्तर

NCP Leader Chhagan Bhujbal : अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या बंडात त्यांना साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आता जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले आहे. ( NCP Leader Chhagan Bhujbal Death Threat )

भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून ही धमकी देण्यात आली असून धमकी देणाऱ्याने फोनवर बोलताना प्रशांत पाटील असे आपले नाव सांगितले होते. त्यांनतर याच फोनच्या आधारे पुणे पोलिसांनी शोध घेत
प्रशांत पाटीलला महाड येथून ताब्यात घेतले आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

मला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. मी सांगून काम करतो म्हणून फोन केला. अशी धमकी पाटील याने भुजबळांच्या कार्यालयातील व्यक्तीला फोन करून दिली. भुजबळ यांना प्रशांत पाटील याने दारूच्या नशेत ही धमकी दिली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले असून पाटील हा मूळचा कोल्हापूर येथील आहे. या धमकीच्या फोननंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाटील याला महाड येथून ताब्यात घेतले असून पाटील संदर्भातील पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.

धमकी देणाऱ्या प्रशांत पाटीलचे फोनवरील संभाषण जशास तसे

प्रशांत पाटील ( धमकी देणारा मद्यपी ) : भुजबळांच्या ऑफिसमध्ये लागलाय का फोन ?

संतोष गायकवाड ( छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील व्यक्ती ) : नाही मोबाईलवर लावलाय सर आपण फोन, मी संतोष गायकवाड बोलतोय. बोला…

प्रशांत पाटील : भुजबळांच्या ऑफिसमध्ये लागलाय का फोन ?

संतोष गायकवाड : हा बोला…

प्रशांत पाटील त्याची सुपारी मिळालीय मला… मारायची

संतोष गायकवाड : हं… ( आवाज येत नसल्याच्या सुरात )

प्रशांत पाटील : त्यांना मारायची सुपारीला मिळालीय मला

संतोष गायकवाड : हं… ( आवाज येत नसल्याच्या सुरात )

प्रशांत पाटील : त्यांना मारायची सुपारी मिळालीय म्हंटल मला

संतोष गायकवाड : तुम्हाला काय सुपारी मिळाली ?

प्रशांत पाटील : हा… त्यांना मारायची

संतोष गायकवाड : कोण बोलताय तुम्ही ?

प्रशांत पाटील : प्रशांत पाटील बोलतोय

संतोष गायकवाड : कुठून ?

प्रशांत पाटील : प्रशांत पाटील बोलतोय… त्यांना मारायची सुपारी मिळालीय, त्यांना उद्या मी मारणार

संतोष गायकवाड : कोणी दिली सुपारी ?

प्रशांत पाटील : आपण सांगून काम करतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं

संतोष गायकवाड : कोणी दिली सुपारी तुम्हाला

प्रशांत पाटील : दिली असंच कोणीतरी

संतोष गायकवाड : अरे बापरे… साहेबांनी काय वाईट केलं तुमचं ? तुम्ही कशाला मारणार साहेबांना

प्रशांत पाटील : काय केलं ते साहेबांना माहित, आपण सांगून काम करतो म्हणून मी सांगायचं काम केलं… ठीक आहे ठेवा.

आशा संभाषणाची ऑडिओ क्लिप आता सोशल माध्यमातून व्हायरल झाली आहे. मात्र याबाबतची पुष्टी लेट्सअप मराठी करत नाही.

वर्षावर शिंदे-फडणवीस अन् पवारांमध्ये तीन तास खलबतं; खाते वाटपाचा तिढा सुटणार?

दरम्यान, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या सुमारे 35 आमदारांनी राष्ट्रवादीसोबत बंड केले. तेव्हापासून छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत आहेत. शरद पवारांकडून देखील भुजबळ यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात येत असून त्यांनी भुजबळांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यामुळे हा संघर्ष भविष्यात वाढतच जाणार, असं बोललं जातं आहे. दरम्यान, भुजबळ यांना धमकी आल्याने त्याचे अर्थ वेगवेगळे लावले जात होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रशांत पाटील याने दारू पिऊन धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. परंतु याची चर्चा राज्यभर होत आहे. तरी देखील या धमकी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube