परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना अहिल्यानगरच्या कृषिकन्येने दिले योगाचे धडे; श्रीगोंद्याच्या प्रियंका शिंदे हिची योग क्षेत्रात मोठी झेप
International Yoga Day 2026: नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील प्रसिद्ध नेहरू पार्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
International Yoga Day 2026: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2026) नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढवणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील कृषिकन्या प्रियंका बापूराव शिंदे (Priyanka Shinde) हिने भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्यासह अनेक उच्चपदस्थ राजनैतिक अधिकाऱ्यांना योगाचे मार्गदर्शन केले.
नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील प्रसिद्ध नेहरू पार्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध देशांचे राजदूत आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून देत, प्रियंका शिंदे हिने विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले आणि त्यांच्याकडून योगसाधना करून घेतली.
प्रियंका हि ‘नॅशनल योगा चॅम्पियन’ असून तीने कमी वयातच योग क्षेत्रात देशभरात मोठे नाव कमावले आहे. देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर योग सादर करण्याची संधी मिळणे, हा केवळ घारगावचाच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा मोठा बहुमान मानला जात आहे. सध्या ती दिल्ली येथे देशातील एकमेव सरकारी योग संस्था असलेल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय महाविद्यालयात योगाचे शिक्षण घेत आहे. या महाविद्यालयामार्फत तीने संसद भवन तसेच अनेक सरकारी संस्थांमध्ये योग प्रात्यक्षिके सादर केली आहेत. या यशाबद्दल प्रियंकावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जागतिक पितृदिनाची सर्वोत्तम भेट
आमच्या कन्येने कमी वयात राष्ट्रीय पातळीवर योग क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. आमच्या कुटुंबाला योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिने मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. आज लेकीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय, ही जागतिक पितृदिनाची सर्वोत्तम भेट असल्याचे प्रियांकाचे वडिल बापूराव शिंदे यांनी म्हटले आहे.