चित्रपट गीत, लोकसंगीत, रॉक साँग, नृत्य…हजारो रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला

  • Written By: Published:
चित्रपट गीत, लोकसंगीत, रॉक साँग, नृत्य…हजारो रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला

Ahilyanagar ‘Rasikotsav’ : अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- भक्तीगीत, अभंग, गवळण, चित्रपटगीत, लोकगीत, रॉक सॉंग नृत्य आणि विनोदाचा तडका अशा चढत्या क्रमाने यंदाचा रसिकोत्सव कार्यक्रम हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने रंगला. रसिक ग्रुपच्या वतीने सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर वैभवशाली अहिल्यानगरची सांस्कृतिक ओळख असलेला आणि मराठी अस्मिता, संस्कृतीची परंपरा जपत, ‘सुरमयी होऊ दे जगणे, गात आनंदाचे गाणे’ हे ब्रीदवाक्य घेऊन २३ वा रसिकोत्सव गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सजला.

विधान परिषदेचे सभापती, प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त यशवंत डांगे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा यांच्यासह प्रायोजक व मान्यवर यावेळी उपस्थित होते. एपीकॉर्प चे संचालक आशिष पोखरणा, लेट्सअप व आय लव नगरचे संचालक व उद्योगपती नरेंद्र फिरोदिया, पोखरणा ज्वेलर्सचे संचालक अनिल पोखरणा, कोहिनूरचे संचालक अश्विन गांधी, श्वेता गांधी, पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा, महावीर ग्रुपचे राजेश भंडारी, शबरी इंडस्ट्रियल केटरिंगचे के. के. शेट्टी, कायनेटिक इंजीनियरिंगचे सरव्यवस्थापक शशिकांत गुळवे, क्लासिक व्हील्सचे संचालक सुनील मुनोत, रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्ट चे संचालक आर्किटेक्ट रमेश फिरोदिया, सन फार्माचे अधिकारी नवीन रेड्डी व श्रीनिवास ज्ञालपेल्ली, न्युक्लिअस हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोपाळ बहुरूपी, कायझेन इंजीनियरिंग चे संचालक विजय इंगळे, सिद्धी लॉन्स चे संचालक श्रीहरी टिपूगडे, साई सूर्या नेत्रालयाचे डॉ. प्रकाश कांकरिया व डॉक्टर सुधा कांकरिया, काऊकार्ट चे जितेंद्र बिहानी, रेणुका मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव व प्रशासकीय अधिकारी पी कार्तिक, बँक ऑफ महाराष्ट्र, वितरण एक्सप्रेस, भुतारे डेकोरेटर्स चे गणेश भुतारे, क्लाऊड किचन आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

पार्श्वगायिका अबोली गीऱ्हे हिने सादर केलेल्या बाप्पा मोरया रे या गीताने रसिकोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर नटरंग या चित्रपटातील गाजलेली कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही गवळण त्यांनी सादर केली. त्या पाठोपाठ युवा सिंगर नंबर वन फेम चेतन लोखंडे यांनी प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणारे श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने मे हे गीत सादर केले. तर युवा गायक मंगेश बोरगावकर यांनी मल्हारवारी मोतीयानी घ्यावी भरून, मन उधाण वाऱ्याचे तर प्रसिद्ध पार्श्वगायिका जुईली जोगळेकर यांनी मल्हारी मार्तंड शिव मल्हार, ग पोरी नवरी आली, भिजलेल्या क्षणाला आठवणींचे क्षण हे रॉक सॉंग आयुष्य हे….. ही गाणी सादर केली.

चेतन लोखंडे यांनी जव्हा नवीन पोपट हा हे लोकप्रिय लोकगीत त्याचबरोबर डोकं फिरलया बयेच डोकं फिरलया, पद्मनाभ गायकवाड याने संत एकनाथ महाराजांची असा कसा देवाचा देव बाई लंगडा ही गवळण, काय सांगू राणी मला गाव सुटणा हे लोकप्रिय गीत सादर केले. जीव तुझ्यात रंगला प्रेम धनश्री काडगावकर आणि सहकाऱ्यांनी चंद्रा ही लावणी आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, वाट माझी बघतोय रिक्षावाला आणि झुमर या गाण्यावर दिल खेचत नृत्य सादर केले.

सुर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे हिने हलगी वाजते, पाटलाचा बैलगाडा, पाव्हणं जेवला का ही लोक संगीतावर आधारित गाणी सादर केली. तर पद्मनाभ गायकवाड याने आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शिवबाच होणार रं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे गीत सादर केले. युवा गायक मंगेश बोरगावकर व अबोली गिऱ्हे यांनी दिपाडी डिपांग डिचिबाडी डिपांग हे द्वंद गीत सादर केले. तर चेतन लोखंडे यांनी तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ग न मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नाचू द्या गाणं वाजू द्या, राज आलं जिंकूनिया जगभरी शिवबा राज डंका वाजजी ही गाणी सादर केली. तर जुईली जोगळेकर यांनी मुझे प्यार नही तुझसे हैबा, ऐका दाजीबा, मला लागली कुणाची उचकी, आली ठुमकत नार लचकत, मला जाऊ दे, ही पोली साजूक तुपातली ही गाणी सादर केली.

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांनी हवालदार आणि फिर्यादी बनवून विविध उखाणे घेत धमाल उडवून दिली. त्याचबरोबर खोडकर विद्यार्थी आणि त्याची परीक्षा घेणारी कडक शिक्षिका अशा दोन विनोदी नाटिका सादर करून हास्याची कारंजी फुलवली.

अबोली गीऱ्हे, राधा खुडे, मंगेश बोरगावकर, चेतन लोखंडे, जुईली जोगळेकर आणि पद्मनाभ गायकवाड या गायकांना ट्रम आणि ढोलकीवर नितीन शिंदे, ढोलकवर नागेश भोसेकर, ऑक्टोपॅडवर श्रीकांत गडकरी, कीबोर्डवर निनाद सोलापूरकर व सुनील जाधव तर गिटारवर किरीट मांडवगणे यांनी सुरेल संगीत साथ दिली.

रसिक ग्रुपच्या परंपरेनुसार कार्यक्रमस्थळी प्रवेश करतानाच हातात मोगऱ्याचा गजरा आणि अत्तराचा फाया लावून रसिक प्रेक्षकांचे स्वागत केले जात होते. रंगमचाशेजारी रसिकोत्सव ची आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. स्टेजवर कार्यक्रम सुरू असतानाच आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी, रंगीबेरंगी रिबन शॉट्स आणि कोल्ड फायरचा वापर करून कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. नेत्रदीपक विद्युत रोषणाई व सुस्पष्ट ध्वनी क्षेपणामुळे अविट गोडीच्या गाण्यांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला. सिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी आणि प्रसाद बेडेकर यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी आभार मानले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube