कर्जत-जामखेडच्या MIDC वादात सत्यजीत तांबेंची उडी : म्हणाले, ‘एकही उद्योग आला नाही तर…’

कर्जत-जामखेडच्या MIDC वादात सत्यजीत तांबेंची उडी : म्हणाले, ‘एकही उद्योग आला नाही तर…’

मुंबई : रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसीची आवश्यकता आहेच, पण नुसत्या एमआयडीसी करुन रोजगारनिर्मिती होऊ शकत नाही. जोपर्यंत इथे पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योग येणार नाहीत. सध्याच्या घडीला राज्यात अनेक एमआयडीसी कागदावर किंवा प्रत्यक्षात तयार झाल्या, पण तेथे एकही उद्योग आला नाही त्यामुळे अशा एमआयडीसीचा काहीही फायदा रोजगारनिर्मिती अथवा अर्थव्यवस्थेला होत नाही, असा दावा करत कर्जत-जामखेड वादात नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनीही उडी घेतली आहे. ते विधान परिषदेत एमआयडीसीच्या चर्चेवेळी बोलत होते. (MLC Satyajeet Tambe discuss on karjat Jamkhed MIDC Issue)

काय म्हणाले सत्यजीत तांबे?

तांबे म्हणाले, कर्जतला एमआयडीसी झाली पाहिजे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. कर्जत जामखेड हा त्यासाठी योग्य असा भाग आहे ते जिथे आता इंडस्ट्री येणार अत्यंत गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता सहा एमआयडीसी आहेत. यात अहमदनगर शहर, सुपा, नेवासा, पांढरी पुल, श्रीरामपूर आणि राहुरी आहे. या सगळ्या एमआयडीसी मिळून साधारणता 2000 हेक्टर जमीन आता एमआयडीसीच्या ताब्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये 45 मोठे उद्योग आणि सूक्ष्म, लघु, मध्य मिळून 3 हजार 752 उद्योग कार्यरत आहेत.

एवढा उद्योग होऊन देखील फक्त 80 हजार लोकांनाच आज पर्यंत रोजगार तिथे मिळालेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे एमआयडीसी आपण करतो परंतु उद्योग यायला तयार नाहीत. म्हणून राज्य शासनाचं धोरण आहे की जेव्हा एखादा उद्योग राज्यामध्ये येत असतो तेव्हा तो पहिल्यांदा एमआयडीसीकडे अप्रोच करतो. एमआयडीसीला विनंती करतो, राज्य शासनाला विनंती करतो, आम्हाला अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये करायची आहे आणि ती करण्यासाठी तुम्ही आम्हाला योग्य जागा सुचवा, योग्य सूट द्या. आपण फॉक्सकॉनवेळी या गोष्टी बघितल्या.

आता माझा आपल्याला असा प्रश्न आहे की, अशा जर काही आपल्याकडे आधीच काही लोकांनी मागणी केलेली असेल तर आपण असा उद्योग पहिला आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला किंवा अन्य कोणत्या एमआयडीसीमध्ये पाठवणार का? उद्योग पाहिला येणे गरजेचे आहे, एमआयडीसीनंतर होऊ शकते. परंतु उद्योग पहिला येण्याची खात्रीच झाली तर लोकही जमिनी देतील, मुलंही खुश होतील, बेरोजगारांनाही काम मिळेल आणि उद्योगपतींनाही फायदा होईल. आमची सुपा एमआयडीसी ही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा शेवटचं टोक म्हणून आपण जॅपनीज कंपन्यांसाठी जागा राखीव ठेवली आहे. परंतु अद्याप पर्यंत तिथे देखील उद्योगधंदे म्हणावे तितके आलेले नाहीत. राहुरीची एमआयडीसी अशी आहे की एमआयडीसी होऊन 25 वर्षे झाले पण एमआयडीसीला अजून तिथे पाणी दिलेलं नाही, म्हणून उद्योगधंदे यायला तयार नाहीत. त्यामुळे उद्योग पहिला आणावा आणि मग एमआयडीसी तयार करावी, अशी मागणीही तांबे यांनी केली.

कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा चर्चेत :

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या कमालीचा चर्चेत आहे. अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहात एमआयडीसी मुद्द्यावरुन प्रश्न विचारले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) स्थानिक आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी या मुद्द्यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube