Raksha Khadse: पोलीस हप्ते मागतात; खाजगी वाहनचालकांची तक्रार

Raksha Khadse: पोलीस हप्ते मागतात; खाजगी वाहनचालकांची तक्रार

जळगाव : ग्रामीण भागातून व शहरी भागातून शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खाजगी वाहनचालक (Private driver) वाहतूक करत असतात. वेळेवर शाळेत पोहोचता यावे म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करीत असतात.

या खाजगी वाहनचालकांकडून चोपडा शहरातील वाहतूक पोलीस (Traffic Police) हप्ते मागतात तसेच हप्ता नाही दिला, तर कोर्टाची नोटीस पाठवतात, अशा प्रकारची तक्रार खाजगी वाहनचालकांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याकडे केली.

याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाईच्या सूचना खा. खडसे यांनी केल्या आहेत.

चोपडा येथे आले असता खासदार रक्षा खडसे यांच्याकडे या खाजगी वाहनचालकांनी पोलिसांच्या हप्तेगिरीची तक्रार केली. खडसे यांनी लगोलग शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून या प्रकाराबद्दल विचारणा केली. तसेच हप्ता मागणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

आजूबाजूच्या ग्रामीण भागातून चोपडा शहरात शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी दररोज येत असतात. मात्र, या विद्यार्थ्यांना शासकीय वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने ते खाजगी वाहनांमधून प्रवास करतात.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या प्रवेश मार्गांवर गाड्या आडवून खाजगी वाहचालकांकडून हप्ता देण्याची मागणी करतात.

दोन हजार रुपयांपासून ते पाच-सहा हजार रुपयांपर्यंत हप्ते गोळा केले जात असल्याचे या वाहनचालकांनी खासदार खडसे यांना सांगितले. तसेच हप्ता दिला नाही तर कोर्टाच्या नोटीसीची भिती दाखवली जात आहे.

त्यामुळे हे वाहनचालक पोलिसांच्या हप्तेगिरीमुळे त्रासले आहेत.या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना खासदार रक्षा खडसे यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube