17 जूनपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; प्रवासी, विद्यार्थी आणि साईभक्तांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध

Nilesh Lanke पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Pune Shirdi Sainagar Express

अहिल्यानगर : पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा १७ जून पासून सुरू होत आहे. या रेल्वे सेवेचा शुभारंभ पुणे येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचवेळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. (pune-sainagar-shirdi-express-running-from-june-17-important-facilities-available-for-students-and-sai-devotees)

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी याबाबत खासदार नीलेश लंके यांना पत्राद्वारे माहिती दिली असून, मध्य रेल्वेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. पुणे–साईनगर शिर्डी या थेट रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शैक्षणिक कारणांसाठी ये-जा करणारे विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे संपर्क अधिक सक्षम झाल्याने या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवे परिमाण प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला पुण्याशी अधिक प्रभावी रेल्वे संपर्क उपलब्ध व्हावा तसेच धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार व्हावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी या मार्गावरील रेल्वे सेवेची आवश्यकता अधोरेखित केली होती.

याशिवाय संसदेतील चर्चांपासून ते रेल्वे समित्यांच्या बैठका, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चासत्रे आणि रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनांमधून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन रेल्वे सेवा, प्रवासी सुविधांमध्ये वाढ आणि तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी सातत्याने मांडली होती. या सर्व प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रवाशांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या रेल्वे सेवेचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे

follow us