रसिक ग्रुपला सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचे अधिक बळ मिळो; प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- गुढीपाडव्यानिमित्त सलग २३ वर्षे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून अहिल्यानगरची सांस्कृतिक ओळख संपूर्ण राज्यात करून दिली त्याबद्दल रसिक ग्रुपचे खूप खूप अभिनंदन आणि आगामी काळात देखील त्यांच्याकडून शहराच्या साहित्यिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कामाला बळ मिळो अशी सदिच्छा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
रसिक ग्रुपच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जॉगिंग पार्क मैदानावर आयोजित रसिकोत्सव कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शहराचे आमदार संग्राम जगताप, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, लेट्सअप व आय लव नगरचे संचालक व उद्योगपती नरेंद्र फिरोदिया, एपी कॉर्पचे संचालक आशिष पोखरणा, पोखरणा ज्वेलर्सचे संचालक अनिल पोखरणा, कोहिनूरचे संचालक अश्विन गांधी, श्वेता गांधी, पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा, महावीर ग्रुपचे राजेश भंडारी, शबरी इंडस्ट्रियल केटरिंगचे के. के. शेट्टी, कायनेटिक इंजीनियरिंगचे सरव्यवस्थापक शशिकांत गुळवे, क्लासिक व्हील्सचे संचालक सुनील मुनोत, रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्टचे संचालक आर्किटेक्ट रमेश फिरोदिया, सन फार्माचे अधिकारी नवीन रेड्डी व श्रीनिवास ज्ञालपेल्ली, न्युक्लिअस हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोपाळ बहुरूपी, कायझेन इंजीनियरिंगचे संचालक विजय इंगळे, सिद्धी लॉन्सचे संचालक श्रीहरी टिपूगडे, साई सूर्या नेत्रालयाचे डॉ. प्रकाश कांकरिया व डॉक्टर सुधा कांकरिया, काऊकार्टचे जितेंद्र बिहाणी, रेणुका मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव व प्रशासकीय अधिकारी पी कार्तिक, बँक ऑफ महाराष्ट्र, वितरण एक्सप्रेस, भुतारे डेकोरेटर्स चे गणेश भुतारे, क्लाऊड किचन आदींनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जॉगिंग पार्क मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्याची परंपरा गेल्या २३ वर्षापासून रसिक ग्रुपच्या जयंत येलुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम ठेवलीय. अहिल्यानगर शहराचा नावलौकिक सांस्कृतिक क्षेत्रात वाढविला. नगर शहरातील नाट्यरसिकांसाठी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पाठपुरावा असो की नगरचा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी नगर दर्शन सहल असो, शहराचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण असो की गोरगरिबांच्या झोपडीमध्ये दिवाळीच्या काळात दिवा पेटवून मिठाई वाटपाचे काम असो अशा सर्व कामात स्वतःला झोकून देऊन काम करणारे आणि नवचैतन्य निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे जयंत येलुलकर अशी ओळख त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या कामातून निर्माण केली आहे. अशा शब्दात त्यांनी जयंत येलुलकर यांच्या कामाचे कौतुक केले.
नगर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी म्युझिकल फाउंटन, स्विमिंग पूल, उद्याने अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. मला जनतेने ३ वेळा आमदार म्हणून निवडून देऊन पुरस्कार दिलेलाच आहे. परंतु रसिक ग्रुपने ही यावर्षी रसिक गौरव पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. आगामी काळात रसिक ग्रुपचा रसिक उत्सव अधिक रंगतदार होवो अशा शुभेच्छा आमदार जगताप यांनी यावेळी दिल्या.
स्वामी विश्वानंद महाराज उर्फ राजाभाऊ कोठारी म्हणाले की अहिल्यानगर ही पावनभूमी असून या पावन भूमीमध्ये जयंत येलुलकर यांच्यासारखे कलंदर व्यक्तिमत्व गेल्या २३ वर्षापासून गुढीपाडव्यानिमित्त रसिकोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. 23 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे, अशा शब्दात कौतुक करून त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त अहिल्यानगर शहरातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रास्ताविक पर भाषणात जयंत येलुलकर म्हणाले की, अहिल्यानगर शहराची ओळख एक सांस्कृतिक शहर म्हणून सर्व दूर जावी यासाठी आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने जॉगिंग पार्क मैदानावर भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतो. त्याचबरोबर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नव्या पिढीच्या भवितव्यासाठी विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून, शहराचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांना असंख्य प्रायोजकांचे आणि रसिक प्रेक्षकांचेही गेल्या २३ वर्षापासून प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच आम्ही रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करू शकत आहोत.
यावेळी महेश सूर्यवंशी यांना प्रदीप गांधी स्मृती पुरस्कार तर एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, आ. संग्राम जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे मिलिंद जोशी, भुतारे डेकोरेटर्सचे गणेश भुतारे यांना रसिक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर पर्यावरण संवर्धनाचे काम करणारे प्रभात ग्रुपचे सदस्य जीवन खरात यांचा रसिक ग्रुपच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
रसिक ग्रुपच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर व प्रायोजकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी व प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी आभार मानले.