जातीय दंगलीला राणे कारणीभूत…ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप
Thackeray group leader criticizes Nitesh Rane : जिल्ह्यात जातीय दंगलींना सुरुवात झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यात दोन समाजात दंगल झाली. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान या जातीय दंगलींना भाजपचे आमदार नितेश राणे हे जबाबदार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे पदाधिकारी संभाजी कदम यांनी केले आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे दोन जाती – धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे देखील कदम यांनी म्हंटले आहे.
नगर शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सध्या होणाऱ्या जातीय दंगली प्रकरणावरून पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजी कदम म्हणाले, भाजपचे आमदार नितेश राणे हे शहरात आले होते. त्यांनी येथे येत चिथावणीखोर भाषण करत दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. या होत असलेल्या दंगलींना नितेश राणे हेच जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
शेवगाव तालुक्यात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. यापूर्वी कधीही अशा पद्धतीने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. प्रशासनाने वेळीच याला आळा बसावा यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नगर शहर व जिल्ह्यात अचानक अशांतता कशी काय निर्माण झाली आहे? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. यामुळे अशा दंगलींना रोखण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे असे आवाहन संभाजी कदम यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी शेवगाव शहरात दोन जातीय धर्मांमध्ये मोठा तणाव निर्माण होऊन दंगल झाली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. तसेच मोठी वित्तहानी यावेळी झाल्याचे समोर आले. यामुळे शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आले असल्याचे समोर आले आहे.