मोठी बातमी : भाजपच्या विजय चौधरींचे ऑडिओ व्हायरल करणारा निघाला पीए; अखेर यश टिपरेला अटक
Vijay Chaudhari: या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विजय चौधरी यांचा स्वीय सहायक निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Vijay Chaudhari Audio Clip : नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी (Vijay Chaudhari ) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. विजय चौधरी आणि इतर नेत्यांच्या अनेक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झालेल्या आहेत. या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विजय चौधरी यांचा स्वीय सहायक निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यश टिपरे असे त्याचे नाव आहे.
विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून यश टिपरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत नंदुरबार पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. त्याच अनुषंगाने संशयित यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तपासादरम्यान या कथित ऑडिओ क्लिप नेमक्या कुणाकुणाला पाठवण्यात आल्या, त्या व्हायरल करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का ? तसेच त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. दरम्यान, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह अथवा तपासाधीन माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपासानुसार आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.