10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 113 पार; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी मोठा झटका
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे.
Petrol-Diesel Price Hike : देशभरात महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. यावेळी पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैशांची तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता 102 रुपये 12 पैसे प्रति लिटर तर डिझेल 95 रुपये 20 पैसे प्रति लिटरवर पोहोचले आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले असून डिझेलचे दरही 98 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
गेल्या 10 दिवसांत इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. 15 मे रोजी पहिली मोठी दरवाढ करण्यात आली. त्यानंतर 19 मे आणि 23 मे रोजीही दर वाढवण्यात आले आणि आता 25 मे रोजी पुन्हा एकदा इंधन महागले आहे. या चार वाढींनंतर पेट्रोल तब्बल 7 रुपये 35 पैशांनी तर डिझेल 7 रुपये 53 पैशांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच वाहनचालक, व्यापारी आणि वाहतूक क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कोकण सहल ठरली अखेरची; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू
राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 112 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबईत पेट्रोल 111.12 रुपये आणि डिझेल 97.68 रुपये प्रति लिटर झाले आहे. नागपूरमध्ये पेट्रोल 111.70 रुपये तर डिझेल 98.76 रुपये झाले आहे. सोलापुरात पेट्रोल 111.87 रुपये आणि डिझेल 98.55 रुपये, कोल्हापुरात पेट्रोल 111.77 रुपये आणि डिझेल 98.46 रुपये दराने विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 112.47 रुपये तर डिझेल 99.11 रुपये झाले आहे. हिंगोलीमध्ये पेट्रोलने 113 रुपयांचा टप्पा पार केला असून ते 113.02 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. रायगड, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा जिल्ह्यांमध्येही इंधन दरात मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही इंधन दरांचा भडका उडाल्याचे चित्र आहे. लंडनमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 190 रुपयांच्या पुढे गेले आहेत. युरोपियन देशांमध्ये पेट्रोल 179 रुपयांहून अधिक दराने विकले जात आहे. जगातील सर्वात महाग पेट्रोल सध्या हाँगकाँगमध्ये असून ते जवळपास 300 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. नेदरलँड्समध्येही पेट्रोल भारतीय चलनानुसार 245 ते 255 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.