तर ‘विखे पाटील’ दहा वर्षांपूर्वीच CM झाले असते…

तर ‘विखे पाटील’ दहा वर्षांपूर्वीच CM झाले असते…

एकनाथ शिंदे जाणार अन् मुख्यमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) येणार! या आशयाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात मागच्या वर्षभरापासून दबक्या आवाजात होत असतात. एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे या चर्चांना कधी खुद्द भाजपचे नेते हवा देतात, तर कधी माध्यमे. काही दिवसांनी या चर्चा शांत होतात आणि मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतात. (Radhakrishna Vikhe Patil would have become CM ten years ago)

आता शिंदे यांच्यावरील अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. 31 डिसेंबरपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा निर्णय घ्यायचा आहे. विधानसभेच्या आतमध्ये या घडामोडी सुरु असतानाच बाहेर विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. पण यावेळीही या चर्चा विखे पाटलांच्या 10 वर्षांपूर्वी हुकलेल्या मुख्यमंत्रीपदाच्याच आहेत.

‘एक फुल अन् दोन डाऊटफुल’; संजय राऊतांचा एका वाक्यात तिघांवर निशाणा

“विखे पाटील दहा वर्षांपूर्वीच CM झाले असते” असे म्हणत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या आठवणींना उजाळा दिला आहे. अधिवेशन काळात पत्रकार आणि नेत्यांमध्ये अशा गप्पा होतच असतात. अशाच अनौपचारिक गप्पा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात रंगल्या असताना ही माहिती समोर आली आहे.

तर विखे पाटील दहा वर्षांपूर्वीच CM झाले असते…

2014 साली तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आषाढी एकादशीनंतर राजीनामा होणार होता. त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू होत्या. मुख्यमंत्री या नात्याने चव्हाण यांनी आषाढी एकादशीची पुजा केली आणि दिल्ली गाठली. त्यावेळी नुकतेच परदेशातून परत आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चव्हाणांनी भेटही घेतली.

दुसऱ्या बाजूला विखे पाटील हे सुद्धा त्याच काळात मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या आशेने दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी आवश्यक राजकीय गोळाबेरीजही केली होती. विखे पाटील आणि शरद पवार यांचे राजकीय वैर पाहता शरद पवार त्यांच्या नावाला संमती देतील का? हा प्रश्नही त्यांनी तयार होऊ दिला नाही. त्यांनी पवारांकडूनही ग्रीन सिग्नल आणला होता.

MLA Disqualification Case : गुवाहाटीचे तिकीट कोणी काढले ? दीपक केसरकरांना तिखट सवाल

त्यावेळी राज्य सहकारी बँक आणि विविध प्रकरणांवरुन शरद पवार यांचे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे, अशी जहरी टीकाही पवारांनी केली होती. त्यामुळे वीट मऊ म्हणत विखे पाटील यांच्या नावाला पवारांनी संमती दिली होती.

आता विखे पाटील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, याचीही उच्चपदस्थ वर्तुळात अटकळ बांधण्यात येत होती. तेवढ्यात डाव फिरला. राहुल गांधींची भेट चव्हाणांसाठी फलदायी ठरली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय मावळला.

त्यानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. तर, 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता ते शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. पण आजही विखे पाटलांभोवती ते मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरुच असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube