मिरवणुका आणि सजावट नव्हे, शिवरायांचे विचार अंगीकारा; राज ठाकरेंचे आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत एक भावनिक आणि परिपूर्ण पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 46

Raj Thackeray’s appeal : शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत एक भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भांनी परिपूर्ण अशी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करत हा दिवस केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा व्हावा, अशी भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, 6 जून 1674 रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला, तेव्हा तो केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर अनेक शतकांच्या आक्रमणांनी खचलेल्या समाजासाठी नव्या आशेचा आणि स्वाभिमानाचा उदय होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी केवळ महाराष्ट्राचं नव्हे, तर संपूर्ण हिंद प्रांत परकीय सत्तांच्या आक्रमणाखाली दबला गेला होता. अशा परिस्थितीत स्वराज्याचे स्वप्न पाहणे आणि अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणे हे असामान्य धैर्याचे प्रतीक होते.

तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका

तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर जवळपास 29 वर्षांच्या संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची संस्कृती, स्वतःची भाषा, स्वतःची कारप्रणाली आणि स्वतःची राज्यकारभाराची व्यवस्था असलेले स्वतंत्र राज्य उभे केले. राज्याभिषेकाच्या माध्यमातून या स्वराज्याची घोषणा जगासमोर करण्यात आली. हा केवळ एका राज्याचा जन्म नव्हता, तर स्वातंत्र, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचा विजय होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाची तुलना जगातील दोन महत्वाच्या ऐतिहासिक घटनांशी केली आहे. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेतील 13 वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि 14 जुलै 1779 रोजी फ्रेंच क्रांती घडली. मात्र या दोन्ही घटनांच्या जवळपास शंभर वर्षे आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्याचा विचार प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर मांडला होता. जसा अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेने आणि फ्रेंच क्रांतीने त्या-त्या देशांचा भूगोल, इतिहास आणि भविष्य बदलले, तशीच परिवर्तनाची ताकद शिवराज्याभिषेक दिनामध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल; अंदमान समुद्रातून ऊर्जा संपत्तीचा शोध

पुढे मराठ्यांनी हिंद प्रांतावर निर्माण केलेल्या प्रभावाची आणि ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्यलढ्याला मिळालेल्या प्रेरणेची बीजे देखील शिवराज्याभिषेकातूनच रोवली गेली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात स्वराज्याची आस निर्माण केली नसती, तर हा प्रदेश कदाचित आणखी अनेक शतकं परकीयांच्या अधिपत्याखाली राहिला असता, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर राष्ट्रोय सणाप्रमाणे साजरा व्हावा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठी जनतेने केवळ सजावट, मिरवणूका आणि उत्सव यापुरते मर्यादित न राहता आपण कोणाचे वारस आहोत, याचे स्मरण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे अनुकरण करण्याचा संकल्प या दिवशी करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

follow us