14.70 कोटींचा निधी, खर्च फक्त 65 लाख! खासदार धैर्यशील मानेंच्या कामगिरीचा अहवाल समोर
अधिकृत नोंदींवर आधारित अहवालानुसार खासदार माने यांना आतापर्यंत 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Report on Dhairyasheel Mane’s performance revealed : कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या कामांची आकडेवारी आता समोर आली असून निधी वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकृत नोंदींवर आधारित अहवालानुसार खासदार माने यांना आतापर्यंत 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र या निधीपैकी केवळ 65 लाख 20 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच उपलब्ध निधीच्या केवळ 4.4 टक्के निधीचा वापर झाला आहे. याचबरोबर एकूण 13 विकासकामांना मंजुरी देण्यात आली असली तरी त्यापैकी फक्त 2 विकासकामे पूर्ण झाली असून 11 कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे काम पूर्णत्वाचे प्रमाण केवळ 15.4 टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.
समोर आलेल्या या अहवालातील आकडेवारीनुसार मंजूर झालेल्या निधीपैकी सुमारे 14 कोटी रुपये अजून देखील खर्चाविना शिल्लक आहेत. तर 45 लाख 20 हजार रुपयांची देयके प्रक्रियेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध निधीचा वापर आणि विकासकामांची गती या दोन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास 2024 मध्ये 3 कामांसाठी 69 लाख 70 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 2025 मध्ये 8 कामांसाठी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले, तर 2026 मध्ये 2 कामांसाठी 20 लाख रुपयांची शिफारस करण्यात आली आहे.
पत्रकारांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटलांवर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
पूर्ण झालेल्या कामांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीत हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे किसान मगदूम यांच्या घरापासून देवतळीपर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश आहे. या कामासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आले असून ते फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण झाले. याशिवाय रुकडी गावातील मुख्य रस्त्यांच्या बांधकामाचे काम देखील 10 लाख रुपयांच्या निधीतून पूर्ण करण्यात आले आहे. ही दोन्ही कामे खासदार निधीतून पूर्ण झालेली प्रमुख कामे म्हणून अहवालात नमूद आहेत.
तर दुसरीकडे अनेक विकासकामे अद्याप शिफारशीच्या किंवा प्रगतीपथावरील टप्प्यात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील तर्डाळ येथे सामुदायिक सभागृह बांधकाम, सांगली जिल्ह्यातील तांबवे बागणी येथे सामुदायीक सभागृह उभारणी, तसेच रेठरे धारण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कुलमध्ये स्पेस लॅब स्थापन करण्यासारखी कामे अद्याप पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय मराळनाथपूर परिसरातील रस्ते विकासाचे काम देखील प्रलंबित आहे.
एकूणच, कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना देखील त्यातील फक्त 4.4 टक्के निधी खर्च झाल्याचे आणि मंजूर 13 कामांपैकी फक्त 2 कामे पूर्ण झाल्याचे चित्र या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे उर्वरित निधीचा वापर कधी होणार, प्रलंबित कामे कधी पूर्ण होणार आणि विकासकामांना गती मिळणार का?, याकडे आता हातकणंगले मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.