नाथाभाऊंच्या मनात दडलं काय? राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा; अमृत महोत्सवात खडसेंच्या भावनांचा बांध फुटला
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला राजकारणातील दिग्गजांची उपस्थिती.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Khadse) यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला राजकारणातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सोहळ्यात खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील चढउतार, संघर्ष आणि कटू प्रसंगांना उजाळा दिला. विशेष म्हणजे, कोणत्याही नेत्यावर थेट टीका न करता त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भाषणातून आणि चेहऱ्यावरील भावांतून अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासाची अस्वस्थता आणि समाधान दोन्ही उपस्थितांना जाणवत होते.
आपल्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देताना खडसे यांनी 1978 मधील पहिल्या निवडणुकीचा उल्लेख केला. त्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर 1990 मध्ये विधानसभेत प्रवेश केला आणि दीर्घकाळ भाजपमध्ये काम करत पक्षवाढीसाठी योगदान दिले. विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या सहकार्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्या काळातील राजकारणात मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंधांमध्ये कटुता नव्हती, अशी खंतही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली
राजकीय आयुष्यात अनेक चढउतार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला आधार दिला, असे खडसे यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्याबद्दल पूर्वीपासूनच आकर्षण असल्याचे सांगत त्यांनी पवार यांच्या कृषी दिंडीच्या आठवणीही जागवल्या. राजकीय आयुष्यात योग्य वेळी साथ मिळाली नसती तर आपण कदाचित राजकारणाच्या पडद्याआड गेलो असतो, अशी भावनिक कबुली त्यांनी दिली. महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा जलसंपदा विभागात केलेल्या कामाचा विशेष उल्लेखही त्यांनी केला
आजचं राजकारण पाहून वेदना होतात, अशी स्पष्ट भावना खडसे यांनी व्यक्त केली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्या काळातील राजकारणाचा संदर्भ देत त्यांनी त्या काळातील राजकीय संबंध आणि कार्यपद्धतीची आठवण करून दिली. 2000 ते 2014 या काळात भाजप सत्तेत नसतानाही पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी अनेकांनी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. आपल्या मुलाच्या निधनाच्या कठीण काळात कुटुंबीयांनी दिलेल्या साथीलाही त्यांनी भावनिक उजाळा दिला
मुक्ताई मंदिराच्या निधीचा मुद्दाही खडसे यांच्या भाषणात पुन्हा एकदा पुढे आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताई मंदिरासाठी निधी मंजूर केला होता आणि त्यातील सुरुवातीचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराचा निधी अडवण्याचे पाप आपण केले नसल्याचे स्पष्ट करत गेल्या सात वर्षांपासून मंदिराला निधी मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोण आले आणि कोण गेले याची चिंता नसून जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे सांगत, आपल्याकडून कोणाला दुखावले गेले असेल तर चुका सुधारण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार रक्षा खडसे, अरुणाभाई गुजराथी, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्री आणि आमदार उपस्थित होते. जयंत पाटील यांनी खडसे यांना सक्षम विरोधी पक्षनेता म्हणत त्यांच्या आक्रमक राजकीय शैलीचे कौतुक केले. तर दिलीप वळसे पाटील यांनी सरकारवर तुटून पडणारा संघर्षमय नेता अशी खडसेंची ओळख असल्याचे सांगितले. नाथाभाऊंची उभी हयात भाजपमध्ये गेली असतानाही त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात भाजपमधील अनेक दिग्गजांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आणि खडसेंच्या मनातील भावनांना त्यांच्या भाषणातून मिळालेला सूर उपस्थितांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.