‘आमच्या नादी लागू नका’, शरद पवारांचा सुशिलकुमार शिंदेंना मिश्किल टोला
Sharad Pawar On Sushilkumar Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार सभारंभामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमच्या नादी लागू नका असा मिश्किल टोला माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना लावला. ते आज विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल,अकलूज येथे बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, शिंदे साहेब यांचा आज 84 व्या वाढदिवस आहे. ते माझ्यापेक्षा लहान आहे. मला शेवटी त्यांना सांगावं लागेल की मी बरा आहे. तुमच्यापेक्षा आठ महिन्यांनी का होईना मी थोरला आहे. त्यामुळे जास्त भानगडीत आमच्या नादी लागू नका. असा मिश्किल टोला शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे लावला.
सुशिलकुमार शिंदे यांच्या आयुष्याचा मोठा काळ सामाजिक क्षेत्रात गेला आहे. ते सुरुवातीला मुंबईला गेले, शिक्षण वाढवले, मिळेल ती नोकरी केली त्यानंतर त्यांना हळूहळू समाजकारणाची आवड निर्माण झाली. निवडणूक लढवली, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, केंद्रात मंत्री झाले. शिंदे यांचा एक वैशिष्ट्य आहे त्यांनी कधीही सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही आणि तसेच त्यांनी सामान्य माणसांशी बांधिलकी सोडली नाही. असं शरद पवार म्हणाले.
तुम्ही सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारोच्या संख्येने येथे उपस्थित आहे. आम्ही उपस्थित आहे हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच सुशिलकुमार शिंदे यांच्यासाठी पहिल्यांदा निवडणूक लढवण्यासाठी करमाळ्याची जागा आम्ही आणि आमच्या जेष्ठ नेत्यांनी निवडली होती याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.