चाकणमधील 20 कंपन्यांचे स्थलांतर म्हणजे धोक्याचा इशारा; शरद पवारांच्या सरकारला तातडीच्या सूचना
पवार यांनी चाकण, तळेगाव तसेच राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करण्याची मागणी केली आहे.
Sharad Pawar issues urgent instructions to the government : पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधत या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चाकणमधील या 20 कंपन्यांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. या उद्योगांचे स्थलांतर झाले तर हजारो कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योग राज्याबाहेर जाण्यापूर्वी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पवार यांनी चाकण, तळेगाव तसेच राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करण्याची मागणी केली आहे. औद्योगिक भागातील खड्डेमय रस्ते, वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या समस्या तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात प्रभावी समन्वय साधून एकात्मिक कृती आराखडा राबवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
नालसार 2026 बॅचच्या पदवीधरांना मोठा दिलासा; दोन तासांत मागे घेतला वकिली नोंदणी रोखण्याचा आदेश
उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न वेळेत सोडवण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी, तसेच उद्योगांसाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रासंदर्भातील आणखी एक चिंताजनक आकडा समोर आणला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत.
फोन हिसकावून घेऊन पाच तास बसून ठेवले, सरकारला मला…. अभिजित दिपकेंचा खळबळजनक आरोप
मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना नियमानुसार मोबदला किंवा नुकसानभरपाई मिळाली का, याची कोणतीही माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचेही संसदेत स्पष्ट करण्यात आले. यावर शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त करत ही बाब अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचे औद्योगिक राज्य म्हणून ओळखले जाते. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती, माहिती-तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात राज्याने देशात आघाडी कायम ठेवली आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा उद्योग बंद पडणे ही राज्यासाठी चिंतेची बाब असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ या विकासदृष्टीचा वारसा जपणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे सांगत, उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने तातडीने आणि ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. चाकणमधील कंपन्यांच्या स्थलांतराच्या निर्णयामुळे राज्याच्या औद्योगिक धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रोजगार, गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सरकार पुढे कोणती भूमिका घेते, याकडे आता उद्योग क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे.