आमदाराच्या मुलाची व्यावसायिकाला धमकी; नाहीतर हातपाय तोडेन
संभाजीनगर : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने एका केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. वाढदिवसाच्या पार्टीचं शिल्लक बिल मागण्यासाठी सदर व्यावसायिकाने सिद्धार्थ याला फोन केला असता धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी 2017 साली आपल्या पुत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एकूण साडे चार लाख रुपयांची होती.
त्यातील काही रक्कम शिरसाट यांनी दिली. पण काही रक्कम शिल्लक राहिली. शिल्लक रकमेत त्यांना 75 हजारांची सूट दिली. त्यानंतर उर्वरित 40 हजार देण्याचं त्यांनी कबूल केलं. पण मी जेव्हा पैसे आणायला त्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा त्यांनी मला केवळ 20 हजार रुपये दिले.
त्यानंतर मी आमदार शिरसाठ यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला असता, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे… आता पैसे मागू नको… तुला जर 40 हजार रुपये पाहिजे होते, तर मग आम्ही दिलेले 20 हजार रुपये तू का घेतले, असा प्रश्न विचारत तू जर असेच पैसे मागत राहिला तर तुझे हातपाय तोडेन, अशी उघड धमकीच सिद्धांत शिरसाट यांनी व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना दिली.
दरम्यान सिद्धांत शिरसाट यांनी थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं बोललं जातंय. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. घडलेल्या प्रकारावर आणि दिलेल्या धमकीवर आमदार संजय शिरसाट किंवा त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.