ठाकरेंना आणखी एक धक्का? अहिर यांच्यानंतर आता पुढचा आमदार फोडायचं टार्गेट ठरलं…

UBT ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली काय घडतंय?

  • Written By: Published:
Uddhav Thackeray

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता विधान परिषदेतील बडे नेते सचिन अहिर यांनीही शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. केवळ प्रवेशच नाही, तर त्यांनी शिंदे गटाच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या धक्क्यातून ठाकरे गट सावरत असतानाच, आता शिंदे सेनेची नजर ठाकरे गटाच्या आणखी एका महत्त्वाच्या आमदारावर, म्हणजेच सुनील शिंदे यांच्यावर असल्याचे राजकीय सूत्रांकडून समजते.

वरळीत ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची रणनीती

सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने वरळी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सचिन अहिर हे ज्याप्रमाणे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडून आले होते, तशाच प्रकारे सुनील शिंदे हे देखील २०१८-२१ च्या कार्यकाळात शिवसेनेच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून आले आहेत. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आणि ठाकरे गटाला संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी शिंदे गट आता सुनील शिंदे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

सुनील शिंदे यांची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत

सचिन अहिर यांच्या बंडावर सुनील शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी अधोरेखित करणारी ठरली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील शिंदे म्हणाले होते, “आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते. सचिन अहिर यांच्या हालचालींची मला कल्पना होती, पण छोटा कार्यकर्ता म्हणून मी त्यावर भाष्य करू शकत नव्हतो.” त्यांच्या या विधानाने पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील उरलेल्या आमदारांचे समीकरण

सध्या विधान परिषदेत ठाकरे गटाकडे खालील मोजकेच आमदार उरले आहेत. यात अंबादास दानवे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, ज.मो. अभ्यंकर, सुनील शिंदे यातील सुनील शिंदे यांची विधान परिषदेची टर्म २०२७ मध्ये संपणार आहे. सचिन अहिर यांना उपसभापती पदाचे आमिष दाखवून शिंदे गटाने जसे ‘ऑपरेशन’ यशस्वी केले, तशीच रणनीती सुनील शिंदे यांच्या बाबतीतही वापरली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाने याला ‘गद्दारी’ आणि ‘सत्तेचा बाजार’ असल्याचे संबोधत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. एकंदरीत, विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानभवनात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण तापले आहे.

follow us