आमदार सुरेश धस भान ठेवा, बिनबुडाचे आरोप करू नका, धनंजय मुंडे समर्थकाचा इशारा
Suresh Dhas : परळी बाजार समितीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची तसेच बाजार समितीची खोटी बदनामी आमदार सुरेश धस करत असून सिरसाळा येथे उभारण्यात आलेले स्व.पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुल हे पूर्णतः शासकीय नियमांचे पालन करून व बाजार समितीच्या मालकी हक्काच्या जागेतच केलेले आहे. त्यामुळे सुरेश धस (Suresh Dhas) यांनी यासंदर्भात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व खोटे असून केवळ बदनामी करण्यासाठी केले आहेत, असे प्रत्युत्तर परळी बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे (Suryabhan Munde) यांनी दिले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथचे उपबाजार पेठ सिरसाळा येथे सर्वे नंबर 343 मध्ये 20 एकर जमीन ही बाजार समितीच्या मालकीची आहे, या मालकीच्या जागेवर भव्य असे 93 गाळ्यांचे कै. पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुल सर्व रीतसर परवानगी घेऊन बांधण्यात आलेले आहे व याचे दिनांक 5/12/2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत दिलेली सर्व माहिती खोटी व बिनबुडाची आहे अशी माहिती सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी दिली. तसेच ऐकीव माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप त्यांनी न करता भानावर यावे, असेही सूर्यभान मुंडे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी बीड यांचे दिनांक 02/09/1985 च्या आदेशानुसार उपबाजार पेठ सिरसाळा येथील 20 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव यांना रीतसर हस्तांतरित केलेली होती, नवीन परळी तालुका झाल्यानंतर तालुका पुनर्रचनेनुसार सिरसाळा परिसरातील 32 गावे कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ यास जोडणे संबंधीची दिनांक 28 जुलै 1998 ची अधिसूचना प्रसिद्ध करून ही गावे परळी बाजार समितीत जोडण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगावच्या मालकीचे मालमत्ता हस्तांतरित करायच्या दृष्टीने परळी बाजार समितीस सर्वे नंबर 343 मधील माजलगाव बाजार समितीच्या मालकीची 20 एकर म्हणजे सुमारे आठ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, त्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी क्रमांक 2007/मशाला-2/जमा-1/29 दिनांक 05/05/2007 अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव यांच्या ताब्यात असलेली उपबाजार पेठ सिरसाळा येथील सर्वे नंबर 343 मधील आठ हेक्टर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ ला आदेश क्रमांक 76/आरबी-2/ एलएनडी/301/1-28/80 दिनांक02/09/1985 मधील सर्व अटीस अधीन राहून हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली होती. ही सर्व कागदपत्रे अमच्यासह शासन दरबारी उपलब्ध आहेत. त्यानुसार या मंजूर आदेशाप्रमाणे माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी सदरील उपबाजार पेठ करिता या मालमत्तेचे मूल्यांकन रुपये 1231622/- एवढी रक्कम बाजार समिती माजलगावला अदा करण्यात यावी त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियम 1963 चे कलम 44 अन्वये परळी बाजार समिती ही जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली होती.
या मिळालेल्या मान्यता नुसार परळी बाजार समितीने नमूद केलेली सर्व रक्कम बाजार समिती माजलगाव यांना अदा करून ही मालमत्ता रीतसर हस्तांतरित करून घेतली आहे व तसेच जमिनीचे 7/12 व 8अ मध्ये बाजार समितीचे मालकी म्हणून 8 हेक्टर जमिनीवर नाव लावण्यात आलेले आहे ते आज रोजी ही कायम आहे, ही जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिनांक 21/07/2003 रोजी च्या मोजणी नकाशा नुसार परळी बाजार समितीने ताब्यात घेतलेली आहे व या जमिनी चे सुधारित बाजार आवाराचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दिनांक 16 जुलै 2015 अन्वये प्रसिद्ध करण्यात येऊन ज्या मध्ये बाजार आवाराची चतु:सीमा नमूद आहे.
या ताब्यात घेतलेल्या 20 एकर जमिनी पैकी पाच एकर जमीन ही माजलगाव बाजार समितीकडूनच रामेश्वर सहकारी जिनिंग करिता भाडेतत्त्वावर देण्यात आलेली होती, परंतु सदरील जिनिंग ही बऱ्याच वर्षापासून बंद असल्या कारणाने व आवसायानात निघालेली असल्यामुळे त्या ठिकाणी बाजार समितीला विकास कामे करावयाच्या असल्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या पाच एकर जमिनीचा ताबा बाजार समितीने घेतलेला होता.
या पाच एकर जमिनीवर बाजार समितीचे संचालक मंडळ सभा दिनांक 09/07/2018 ठराव क्रमांक 6(6) अन्वये भव्य व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव घेण्यात आला. त्याप्रमाणे पणन संचालक पणन संचालनालय पुणे यांच्याकडून दिनांक 07/01/2021 नुसार या पाच एकर जागे करीताच्या विकास आराखड्यास मंजुरी घेण्यात आली व दिनांक 20/10/2020 नुसार या जमिनीच्या आराखड्यास नगर रचनाकार बीड यांच्याकडूनही मंजुरी घेण्यात आली होती या मंजुरी घेतल्यानंतर बाजार समितीकडून 93 गाळ्यांचे कै. पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे बांधकामास परवानगी मिळावी यासाठी माननीय पणन संचालक पणन संचालनालय पुणे यांच्याकडून जाक्र 2497/ दिनांक 26/07/2021 नुसार कलम 12 (1) ची मंजुरी घेण्यात येऊन कै. पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
संचालक मंडळाच्या सभा दिनांक 30/11/2023 ठराव क्रमांक (4) अन्वये या व्यापारी संकुलनाचे उद्घाटन करण्याबाबत विषय सभेच घेण्यात आला हे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिनांक 05/12/2023 रोजी उद्घाटन करण्याचे ठरले होते, त्यानुसार शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री हे या कार्यक्रमासाठी परळी येथे आले असता सदर संकुलाचे उद्घाटनाच्या लोकार्पण सोहळ्याकरिताच्या निमंत्रण पत्रिका सर्व वर्तमानपत्रात छापून आलेल्या आहेत तसेच या इमारतीचे म्हणजे कै. पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अनामत भरलेल्या अधिकृत नोंदणी केलेल्या गाळेधारकांना भाडेपट्टा बाजार समितीकडून करून देण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टींची कागदोपत्री नोंद शासन दरबारी आहे.
यामुळे आमदार सुरेश धस यांच्याकडून हे व्यापारी संकुल बाजार समितीच्या जागेवर बांधण्यात आलेले नाही हे म्हणणे खोटे आहे. तसेच या व्यापारी संकुलाचे उद्घाटन झाले नाही हेही म्हणणे चुकीचे व खोटे आहे.
आमदार सुरेश धस यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत करण्यात आलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असून हे आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच सर्व संचालक मंडळ व बाजार समितीची बदनामी करण्यासाठीच केलेले आहेत असे यावरून दिसते असे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी यावेळी सांगितले.
थोडी तरी लाज बाळगा
स्वर्गीय पंडितअण्णा मुंडे यांनी सुरेश धस यांना 1998 मध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले, स्वतः अध्यक्ष असताना सर्व अधिकार उपाध्यक्षांना दिले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत आष्टीची जागा शिवसेनेकडून भांडून घेऊन भाजपासाठी सोडली आणि त्या ठिकाणी सुरेश धस यांना उमेदवारी देऊन निवडून आणले.
Mercedes G 580 करणार नवीन वर्षात धमाका, 30 मिनिटांत चार्ज अन् 470 किमी रेंज, ‘या’ दिवशी होणार लाँच
पंडितअण्णा हे सुरेश धस यांच्यावर मुलासारखे प्रेम करायचे, त्याच अण्णांच्या नावाने वाढलेल्या मार्केट कमिटीच्या व्यापारी संकुलावर राजकीय द्वेष पोटी आरोप करताना भान आणि लाज बाळगावी असा सल्लाही सूर्यभान मुंडे यांनी धस यांना दिला आहे.