शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भक्तीचा जागर, प्रवचनकार जया किशोरी यांचा श्रीमद् भागवत कथेचा दिव्य सोहळा
प्रवचनकार जया किशोरी यांच्या सुमधुर वाणीतून 18, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
The divine event of Shrimad Bhagwat Katha by Jaya Kishori : लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुऱ्हाणनगर येथे श्रीकृष्ण भक्तीचा भव्य आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. विश्वविख्यात आध्यात्मिक वक्त्या आणि प्रवचनकार जया किशोरी यांच्या सुमधुर वाणीतून 18, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तर 21 ऑक्टोबर रोजी ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाने या भक्तिमय पर्वाची सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या पुढाकारातून जय्यत तयारी करण्यात आली आहे.शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा आध्यात्मिक सोहळा त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरणार आहे. श्रीकृष्ण भक्ती, भागवत विचार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
जया किशोरी यांच्या वाणीतून भागवत कथेची वाणी
बुऱ्हाणनगर येथील आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत श्रीमद् भागवत कथा होणार आहे. जया किशोरी यांच्या ओघवत्या वाणीतून श्रीकृष्ण भक्तीचा महिमा, भागवत कथेतील प्रसंग आणि जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक विचार भाविकांना ऐकायला मिळणार आहेत. कथा संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारी अर्ज वैध ठरवला
21 ऑक्टोबरला जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे. भागवत कथा आणि कीर्तन अशा दोन्ही माध्यमांतून भक्तिरसाची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हजारो भाविकांसाठी भव्य नियोजन; व्यवस्थेवर विशेष भर
या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी आवश्यक व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भाविकांना कथा आणि कीर्तनाचा लाभ घेता यावा, कार्यक्रमस्थळी शिस्तबद्ध व्यवस्था राहावी आणि उपस्थितांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.:आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या आध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून बुऱ्हाणनगरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. सलग चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे बुऱ्हाणनगरमध्ये श्रीकृष्ण भक्तीचा जागर अनुभवायला मिळणार आहे.