अकोल्यात 5 कोटींच्या भूखंड फसवणुकीने खळबळ; युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक

या प्रकरणातील भूखंड 5 हजार 75 चौरस फूट असून त्याची मालकी 84 वर्षीय शांता बाहेकर यांच्याकडे असल्याची माहिती आहे.

News Photo   2026 08 29T154025.606

अकोल्यातील मलकापूर परिसरातील तब्बल 5 कोटी रुपयांच्या भूखंडाच्या कथित फसवणुकीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अकोला जिल्हाप्रमुख आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण यांचा समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. त्यांच्यासह राहुल जाधव आणि प्रियांका पाटील ऊर्फ प्रियंका चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयाने तिघांनाही 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील भूखंड 5 हजार 75 चौरस फूट असून त्याची मालकी 84 वर्षीय शांता बाहेकर यांच्याकडं असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून भूखंडाचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. शांता बाहेकर यांचे नाव धारण करण्यासाठी एका महिलेला प्रवृत्त करण्यात आलं आणि त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाचे खोटे खरेदीखत तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

सुभाष चंद्रा यांच्या प्रकरणामुळे ‘हेअरकट’ पुन्हा चर्चेत; बँका हजारो कोटींचे कर्ज का सोडतात?

गुन्हा दाखल होताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेली प्रियांका पाटील ऊर्फ प्रियंका चव्हाण ही आस्तिक चव्हाण यांची वहिनी असल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवाईमुळं भूखंड व्यवहारामागील संपूर्ण प्रक्रियेवर आता पोलिसांचे लक्ष केंद्रित झालं आहे.

दरम्यान, बनावट कुलमुखत्यारपत्र आणि खरेदीखत नेमकं कुठं तयार करण्यात आलं, त्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि या व्यवहारामागं आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्ती किंवा मोठे नेटवर्क सहभागी आहे का? याचाही शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. त्यामुळं 5 कोटींच्या भूखंड व्यवहाराचे धागेदोरे तपासात कुठपर्यंत पोहोचतात, याकडं आता अकोल्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us