अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; मोबाईलमधील राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने आणि मोठ्या लोकांशी संबंधांची चौकशी
खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Twist in Ashok Kharat case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्याचा मुक्काम १ एप्रिलपर्यंत कोठडीतच राहणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्याच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, सरकारी वकिलांनी तपासासाठी आरोपीची कोठडी किती महत्वाची आहे, हे ठोस मुद्द्यांसह न्यायालयासमोर मांडले. सरकारी बाजूचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अखेर तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली.
सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी काही गंभीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी सांगितले की, अशोक खरात चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य करत नाही. विशेषतः महिलांवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे तपास अपूर्ण असून त्याला पुढे नेण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे.
तसेच, आरोपीच्या मोबाईमधील डेटा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला असून त्याची क्लोन कॉपी देखील तयार करण्यात आली आहे. या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी देखील पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
व्हीआयपींची गुप्त हजेरी, रात्रीच्या अंधारात भेटी; नाशिकमधील ‘तृप्तबाला’ बंगल्यामुळे खरात प्रकरणात खळबळ
याशिवाय, महिलांच्या शोषणाशी संबंधित अत्यंत धक्कादायक बाबही समोर आली आहे. आरोपी महिलांना पेढे खायला देत आणि कडवट-खारट पाणी पिण्यास देत असे. हे सेवन केल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होणे आणि डोके जड होणे अशा तक्रारी जाणवत होत्या. त्यानंतर आरोपी सांगेल तसे त्या वागत असल्याचा संशय आहे. या प्रकारामागचे नेमके कारण काय, याचा तपास अद्याप बाकी आहे.
तपास यंत्रणांच्या मते, अशोक खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली असण्याची शक्यता आहे. ही संपत्ती नेमकी कुठे आणि कोणाच्या नावावर आहे, याचा शोध घेणेही आवश्यक आहे. तसेच, या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला आणखी कोणी मदत केली का, याचाही तपास सुरू आहे. एकंदरीत, प्रकरण अत्यंत गंभीर असून तपास अजून प्राथमिक टप्प्यात आहे. डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य पीडित महिलांची माहिती समोर येणे बाकी आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यासाठीच न्यायालयाने अशोक खरात याला तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.