मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमधून बदल्या-बडतर्फीचे व्यवहार? खरात प्रकरणात संजय राऊत यांचे गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत राज्य सरकारवर थेट निशाणा साधला.

  • Written By: Published:
Untitled Design 117

Sanjay Raut’s serious allegations in the Kharat case : नाशिकमधील तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आधीच राज्यात खळबळ उडवली असताना, आता या प्रकरणाला मोठा राजकीय रंग चढला आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत राज्य सरकारवर थेट निशाणा साधला. राऊत यांनी दावा केला की, अशोक खरात हा केवळ भोंदू बाबा नसून तो “सरकारचा माणूस” आहे. त्याच्या पाठीशी तब्बल 40 आमदार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

तसेच मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथून शिक्षण विभागातील बदल्या आणि बडतर्फीचे व्यवहार खरातच्या नेतृत्वाखाली चालत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामात थेट हस्तक्षेप करत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत खरातला पोहोचवण्यामध्ये दीपक केसरकर यांची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

व्हीआयपींची गुप्त हजेरी, रात्रीच्या अंधारात भेटी; नाशिकमधील ‘तृप्तबाला’ बंगल्यामुळे खरात प्रकरणात खळबळ

त्यामुळे शिंदे आणि केसरकर या दोघांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचीही या प्रकरणात चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरातसारखी व्यक्ती कशी पोहोचली, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज अधोरेखित केली.

खरातच्या संपत्तीबाबत सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, असेही त्यांनी सांगितले. इंधन टंचाईच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी सरकारवर टीका केली. मंत्री छगन भुजबळ राज्यात गॅस टंचाई असल्याचे सांगतात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करतात, यावरून सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे त्यांनी म्हटले. शेवटी, महिलांच्या शोषणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राऊत म्हणाले की, कोणत्याही प्रकरणात महिलांचे शोषण झाले असेल, तर तो सर्वात गंभीर गुन्हा आहे. या मुद्द्यावर सरकारने स्पष्टपणे भूमिका मांडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

follow us