अहिल्यानगरमध्ये पत्नीच्या जुन्या प्रेमसंबंधातून तरुणाचा खून, मृतदेह कालव्यात फेकला, दोघांना अटक
गणेश हा शुभांगीला भेटण्यासाठी शिंगवे नाईक येथे आला असतान महेश जाधव आणि योगेश जाधव यांनी त्याला पकडले आणि मारहाण करून ठार मारल्याचा आरोप आहे.
Two arrested in connection with the murder of a young man : पत्नीचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय 32, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महेश राजेंद्र जाधव आणि योगेश राजेंद्र जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकलेला गणेशचा मृतदेह राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा येथे आढळून आला. एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईमुळे या खुनाचा उलगडा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश जाधव याची पत्नी शुभांगी हिचे गणेश गायकवाड याच्याशी लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. गणेश हा शुभांगीला भेटण्यासाठी शिंगवे नाईक येथे आला असताना महेश जाधव आणि योगेश जाधव यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला मारहाण करून ठार मारल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती बाहेर पडू नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने दोघांनी गणेशचा मृतदेह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गणेशचा भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड (वय 34, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान महेश जाधव हा राहाता तालुक्यातील जळगाव येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कारवाई करून महेशला ताब्यात घेतले.
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदेंवर निशाणा, गृहखात्याच्या चौकशीची मागणी
दरम्यान, दुसरा आरोपी योगेश जाधव हा राहुरी येथील मुळा धरण परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर गणेशचा मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी कालव्याच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. कालव्याच्या विविध भागांत शोध घेतल्यानंतर राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा येथे गणेशचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नातेवाइकांना बोलावले. नातेवाइकांनी मृतदेह गणेश गायकवाड याचाच असल्याची खात्री केली. त्यामुळे तपासातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणातील महेश जाधव आणि योगेश जाधव या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खुनामागील नेमकी परिस्थिती, घटनेचा घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात करीत आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे तसेच इतर अधिकारी व अंमलदार आणि सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.