आताच्या खासदारांनी उसणं फेडावं, आम्हाला आमचं शेत द्यावं; हातकणंगलेसाठी सदाभाऊंनी ठोकला शड्डू

आताच्या खासदारांनी उसणं फेडावं, आम्हाला आमचं शेत द्यावं; हातकणंगलेसाठी सदाभाऊंनी ठोकला शड्डू

Hatkanangle LokSabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle LokSabha) उमेदवारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी हातकणंगलेमधून अगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अशात राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील महायुतीकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना आपण मदत केली. आता त्यांनी उसणं फेडावं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की आम्ही महायुतीसोबत 2014 पासून आहोत. रयत क्रांती पक्ष हा भाजपचा घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये आहे. 2014 ला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही मशागत केली होती. हातकणंगलेचं शेत आम्ही नांगरलं, कोळवलं होतं, पेरलं होतं, पीक देखील जोमानं उगवून आलं, कणसाला दाणं चांगलं आलं पण कापणीच्या वेळी दुसरा गडी आला आणि कापून घेऊन गेला. त्यामुळे यावेळी आमचं शेत आम्हाला मिळावं. आता जे खासदार आहेत त्यांनी आमचं उसणं फेडावं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

गावगाड्यात एखादा बैल घेऊन दुसऱ्याचं शेत नांगरायला गेला तर पुढच्या वेळी बैल घेऊन गेलेला शेतकरी पहिल्या शेतकऱ्याचं शेत नांगरायला येतो. तसं आताच्या खासदारांनी माझ्या शेतावर बैल घेऊन नांगरायला यावं, कारण आगोदर मी त्यांच्या शेतावर बैल घेऊन नांगरायला गेलो होतो. त्यामुळे तो मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

बसपाच्या ‘हत्तीची’ लोकसभेच्या पटावर स्वबळाची चाल; ‘इंडिया’ आघाडी चेकमेट?

माझ्या विरोधात कोण उभा राहिलं हे मला सांगता येत नाही. मी कोणत्याही व्यक्तीविरोधात निवडणूक लढवत नाही. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवणार आहे. शेतीच्या आयात-निर्यातीचे धोरण लोकसभेत ठरतं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की काही झालं तरी हातकणंगले लोकसभा लढवायची. त्यामुळे महायुतीकडे हातकणंगले लोकसभेची जागा मागितली आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा, शिष्टमंडळ जरांगेंना नवा ड्राफ्ट देणार; बच्चू कडूंचे वक्तव्य

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने सध्या खासदार आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी तयारी सुरु केली आहे. राजू शेट्टी यांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. आता सदाभाऊ खोत यांच्या दावेदारीने हातकणंगले लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज