गोवाल पाडवींच्या नावावर 279 विकासकामे, पण पूर्णत्वाचा आकडा शून्य; निधी वापराबाबत प्रश्नचिन्ह
खा. ॲड. गोवाल पाडवी यांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना अर्थात MPLADS अंतर्गत तब्बल 14 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Zero expenditure recorded for Goval Padvi’s funds : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना अर्थात MPLADS अंतर्गत तब्बल 14 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र या निधीचा वापर अद्याप झालेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उपलब्ध अहवालानुसार मंजूर निधीपैकी एक रुपया देखील खर्च झालेला नसून निधी वापराचे प्रमाण शून्य टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे मंजूर निधी असून देखील विकासकामे प्रत्यक्षात कितपत पुढे सरकली आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अहवालानुसार खासदार गोवाल पाडवी यांनी मतदारसंघात विविध विकासकामांसाठी एकूण 279 प्रस्तावांची शिफारस केली आहे. या कामांमध्ये वीज सुविधा, सामुदायिक पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र या 279 पैकी एक देखील काम पूर्ण झाल्याची नोंद उपलब्ध नाही. परिणामी सर्वांच्या सर्व 279 कामे अद्याप प्रलंबित असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. कामांच्या पूर्णत्वाचे प्रमाण देखील शून्य टक्के असल्याने विकासकामांच्या अंमलबजावणीचा वेग अत्यंत संथ असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे मंजूर करण्यात आलेला संपूर्ण 14 कोटी 80 लाख रुपयांचा निधी अद्याप शिल्लक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खर्चाची कोणतीही नोंद नसल्याने निधी प्रत्यक्ष विकासकामांवर वापरला गेला नसल्याचे दिसून येते. तसेच प्रगतीयपथावरील कामांसाठी देखील कोणतेही पेमेंट झाल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे निधी मंजूर होऊन देखील त्याचा लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मी सर्वांची माफी मागतो…, उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये शिंदे अन् फुटीर खासदारांवर भडकले
अहवालातील वर्षनिहाय आकडेवारी पाहिली असता, 2025 मध्ये 11 विकासकामांसाठी सुमारे 32 लाख रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली होती. तर 2026 मध्ये 79 कामांसाठी तब्बल 4 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय इतर अनेक कामे विविध टप्प्यांवर प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र निधी मंजुरी आणि कामांच्या शिफारशी यापलीकडे प्रत्यक्ष खर्च किंवा काम पूर्ण झाल्याची नोंद दिसून येत नाही.
शिफारस करण्यात आलेल्या महत्वाच्या कामांमध्ये 63 केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणे, सामुदायिक सभागृहांचे बांधकाम करणे यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांसाठी ही कामे महत्वाची मानली जात असताना त्यांची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.
खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा उद्देश लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या आणि आवश्यक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र नंदुरबार मतदारसंघात मंजूर झालेल्या 14 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीपैकी एकही रुपया खर्च झालेला नसल्याचे आणि 279 पैकी एकही काम पूर्ण झालेले नसल्याचे चित्र समोर आल्याने विकासकामांच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता हा निधी प्रत्यक्षात कधी वापरला जाणार, प्रलंबित कामे कधी पूर्ण होणार आणि मतदारसंघातील नागरिकांना या निधीचा लाभ कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.