Kirit Somaiya : विरोधकांचे घोटाळे काढणाऱ्या किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा

  • Written By: Published:
Kirit Somaiya 89120076

भाजप नेते किरीट सोमय्या हे कायम विरोधकांचे भ्रष्ठाचार बाहेर काढताना दिसत असतात. पण याच किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयातच श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमय्या यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनीच संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार नवघर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा : Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन

सोमय्या यांच्या कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांच्या संस्थेमार्फत ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत श्रवणयंत्र ५०० रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करून मशीनचे वाटप होते. कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित यांची प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बँकेत जमा केली जाते.

काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्लक आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा १ हजार ४७२ मशीनची जवळपास ७ लाख ३६ रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसात ठाण्यात याची तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांचे भ्रष्ठाचार बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याच मुलुंडमधील कार्यालयातच श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us