दादर रेल्वेस्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार नाही; आता कोणत्या स्टेशनचे नामकरण होणार ?

दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नामकरणाचा प्रस्ताव दादर मेट्रो स्थानकासाठी असून, केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Dadar Railway Station

Dadar Railway Station : मुंबईतील महत्त्वाच्या दादर रेल्वे स्थानकाचे (Dadar Railway Station) नाव बदलून ‘चैत्यभूमी’ (Chaityabhumi) करण्यावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. आता सरकारकडून या वादाला पूर्णविराम देण्यात आला आहे. आता या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आलीय. नामकरणाचा प्रस्ताव दादर रेल्वे स्थानकासाठी नसून दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारच्या एका परिपत्रकात दादर रेल्वे स्थानकाचा उल्लेख झाल्याने या संपूर्ण प्रकरणात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करण्यात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दादरची ऐतिहासिक ओळख बदलण्याचा प्रयत्न होत असल्याची नाराजी काही नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, आता परिवहन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणासंदर्भात आहे. दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यानुसार पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

केंद्र सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव
मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी लागते. यासाठी विधिमंडळाच्या समितीशी संबंधित प्रक्रियेबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. तसेच मागील वर्षी व्यवस्थापनात जाणवलेल्या त्रुटी दूर करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

follow us