ग्राहकांना ‘गो’कुळ झटका; इतिहासातील सर्वात मोठी वाढ; दूध 6 रुपयांनी महागले

Gokul Milk Price Hike गोकुळ दुध संघाच्या म्हशीच्या दूध विक्री दरात तब्बल 6 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर म्हशीच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • Ninad K
  • Written By: Published:
Gokul Milk

Gokul Milk Price Hike By 6 Rupees : महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी दुग्ध संस्था असलेल्या गोकुळ डेअरीने आपल्या इतिहासातील दूध दरातील सर्वात मोठी वाढ जाहीर केली आहे. डेअरी व्यवस्थापनाने म्हैस आणि गाय अशा दोन्ही दुधाच्या खरेदी आणि विक्री दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नवे दर शनिवारपासून लागू होणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर घेण्यात आलेला हा निर्णय गोकुल डेअरीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक निर्णय मानला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई दौऱ्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवे दर नेमके कसे असतील?

म्हशीचे दूध : विक्री दरात प्रतिलिटर सहा रूपयांची वाढ करण्यात आली आहे. संस्थेच्या इतिहासातील ही एकाच वेळी केलेली सर्वात मोठी वाढ आहे. खरेदी दरात प्रतिलिटर तीन रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

गायीचे दूध : खरेदी आणि विक्री अशा दोन्ही दरांमध्ये प्रतिलिटर दोन रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

जानेवारीत पुन्हा दरवाढीची शक्यता?

पुढे दुधाची उपलब्धता आणि बाजारपेठेतील परिस्थिती बदलल्यास, जानेवारीमध्ये दरांमध्ये पुन्हा एकदा बदल केला जाऊ शकतो, असे संकेत डेअरी व्यवस्थापनाने दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात ग्राहकांना दुधासाठी आणखी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अमूल आणि मदर डेअरीनेही दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 ते 4 रूपयांपर्यंत वाढ केली होती. खरेदी दरातील वाढ, इंधन खर्च आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ ही कारणे त्यांनी दिली होती. यापूर्वी मे महिन्यात जीसीएमएमएफ (GCMMF) आणि मदर डेअरीने किरकोळ विक्री दरात वाढ केली होती, तर गेल्या महिन्यात कर्नाटकातील ‘नंदिनी’ ब्रँडनेही दरवाढ केली होती.

तर, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दूध दरवाढीसोबतच बैठकीत पनीर, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. 16 नोव्हेंबरपासून हे नवे दर लागूदेखील झाले आहेत. त्यानंतर आता गोकुळ डेअरीने आपल्या इतिहासातील दूध दरातील सर्वात मोठी वाढ जाहीर केली आहे. दुधाच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होऊन महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

follow us