‘मोदी@9 ‘च्या 60 हजार पुस्तिकांचे वितरण करणाऱ्या संजय काकडेंना फडणवीसांची शाबासकीची थाप
मुंबईः माजी खासदार व भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी केंद्र सरकारचे नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 पुस्तिका काढली आहे. या पुस्तिकेच्या तब्बल 60 हजारांहून अधिक प्रती पुण्यात वितरित केल्या आहेत. काकडे हे पक्षासाठी करत असलेल्या कामांचे कौतुकही पक्षातील वरिष्ठ नेते करत आहेत. या मोहिमेच्या अहवालाची एक प्रत काकडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईमध्ये भेट घेऊन दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी काकडे यांचे कौतुक केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय, तुम्ही या देशातील माझ्या माहितीतील एकमेव माजी खासदार असाल ज्याने ६० हजारांहून अधिक पुस्तिका प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना दिल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 या पुस्तिकेची काकडे यांनी ६० हजारांहून अधिक छपाई केली होती. पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १० हजारांहून अधिक पुस्तिका काकडे यांनी स्वतः त्या त्या प्रभागातील कार्यकर्त्यांसह नागरिकांना दिल्या आहेत.
उद्यानं, मॉल, महाविद्यालये, हॉटेल, मंदिर, मस्जिद, झोपडपट्टी, सोसायट्या, कार्यालये अशा अनेक ठिकाणी जाऊन तिथल्या नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांतील महत्वाच्या कामांची माहिती असलेली ही पुस्तिका भेट दिली आहे. काकडे यांनी या सर्व मोहिमेचा अहवाल तयार केला असून त्याची एक प्रत फडणवीस यांना दिली आहे.