Letsupp Special : ‘दाऊद इब्राहिम’ मुंबईतून पळून जाण्याचे एक कारण ‘खमका मराठी अधिकारी’ होता…

Letsupp Special : ‘दाऊद इब्राहिम’ मुंबईतून पळून जाण्याचे एक कारण ‘खमका मराठी अधिकारी’ होता…

कितीही मोठा सेलिब्रिटी असो, बिल्डर असो, माफिया असो की गँगस्टर असो. 90 च्या दशकात खैरनार यांना जर अनधिकृत बांधकाम दिसले तर त्यांचा हमखास हातोडा पडणार याची गॅरंटी मुंबईकरांना होती. आज पाकिस्तानमध्ये जाऊन स्थिरावलेला दाऊद इब्राहिमही मुंबईतून पळून जाण्याचे एक कारण गोविंद राघो खैरनार अर्थात गो. रा. खैरनार हे देखील एक होते. खैरनार यांची दुसरी ओळख म्हणजे तब्बल तीन मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेणारा अधिकारी अशी होती.

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिंपळगावमध्ये जन्म झालेले खैरनार हुशार होते. राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाले, मुंबईत आले. पण घर नव्हते म्हणून आणि महापालिकेच्या नोकरीत घर मिळते असे ऐकले होते. मग ते शासकीय नोकरी सोडून पालिकेच्या नोकरीत दाखल झाले. 1976 बीएमसी वॉर्ड ऑफिसर बनले आणि तिथूनच त्यांनी अनधिकृत बांधकामापासून ते फेरीवाले आणि अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करायला सुरुवात केली. खैरनार यांचा हा नित्य उपक्रमच बनला.

त्याकाळी मुंबईच्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये वरदराजन मुदलियार ऊर्फ ‘वरदाभाई’चे मोठे वजन होते. अगदी पोलिसांपर्यंतही त्याचे हात पोहचले होते. पण खैरनार घाबरले नाहीत. त्यांनी त्याच्या अवैध धंद्यांवर कारवाई केली. वरदाभाईने थेट खैरनार यांचे ऑफिस गाठले आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून लाच देण्याची भाषा करू लागला. एकदा तर एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच वरदाभाईने ‘जुळवून घ्या’ असा सल्ला खैरनारांना दिला होता. पण हट्टी स्वभावाचे खैरनार मागे हटले नाहीत.

1985 साली एकेदिवशी दादरला अचानक खैरनार यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या पायात गोळी घुसली. यामागे ‘वरदाभाई’ आणि तत्कालीन काही राजकीय नेते होते, असा अंदाज त्यांना आला. त्यानंतर खैरनार यांनी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी पंगा घेतला. त्यांच्या मुलाने माहिममधील एका बिल्डरकडून हॉटेल घेतले आणि अनधिकृतरित्या वाढवले. खैरनार यांनी हे बांधकाम पाडले. त्यावर अनेक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी खैरनार यांना “आता तुमची नोकरी धोक्यात आल्याचे” सांगितले.

एका मुलाखतीत खैरनार सांगतात, या प्रसंगानंतर एक दिवस मला बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी मला बोलावून घेतले.ते म्हणाले, खैरनार तुम्ही चांगले अधिकारी आहात. पण तुम्ही खालच्या जातीतील आहात म्हणून ही पाडकामाची कारवाई करत आहात. तुम्हाला थांबवले नाही तर समाजात अराजकता माजेल. त्यामुळे तुम्हाला थांबविणे गरजेचे आहे. त्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. आणि मला हेही सांगितले आहे की, शिवसेना आता आता मोठी होत आहे, पण ती नेस्तनाबूत करेण अशी धमकी दिली आहे. ते म्हणाले, खैरनार तुम्ही चांगले अधिकारी आहात. मला आवडत आहे तुमचे काम पण मी तुम्हाला वाचवू शकत नाही, त्यानंतर काहीच दिवसात खैरनार यांच्यावर कार्यालयात गोळीबार झाला. पण मी वाचलो.

1988 साली तत्कालीन पालिका आयुक्त सदाशिव तिनईकर यांनी खैरनार यांना उपायुक्त म्हणून बढती दिली. त्यांच्या या बढतीला विरोध झाला. पण तिनईकर बधले नाहीत. नंतरच्या काळात महापालिका आयुक्त म्हणून शरद काळे यांची नियुक्ती झाली. काळेंनी संपूर्ण मुंबईतील अतिक्रमणविरोधी कारवाईची जबाबदारी खैरनार यांच्यावर सोपवली आणि इथूनच त्यांचा धडाका जोरात सुरु झाला. डोक्यावर पांढरे हेल्मेट आणि हातात लाकडी दंडुक्यावरील लोखंडी हातोडा घेऊन खैरनार कार्यालयाबाहेर पडत आणि एखादी इमारत किंवा अवैध बांधकाम पाडूनच माघारी परत येत. अगदी आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीही ते अक्षता टाकून अनधिकृत बांधकाम पाडायला निघून गेले होते.

याच काळात खैरनार यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ‘मेहजबीन मॅन्शन’ ही वादग्रस्त इमारत पाडली. याशिवाय भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीट, महमद अली रोड इथली अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवरही कारवाई सुरू केली. आजवर ज्यांच्याकडे मान वर करून बघायची कुणाची हिंमत नव्हती, तेथे खैरनार जात होते.

एका मुलाखतीत खैरनार सांगतात, त्यावेळी दाऊद किंवा त्याच्या टोळीतर्फे अवैध इमारतींचे बांधकाम केले जात होते. त्यात सुरुवातीला म्हाडाकडून जुन्या इमारती तोडून नवीन बांधण्यासाठी एनओसी घेतली जात होती. त्याआधारे जुन्या इमारती पाडल्यात जायच्या आणि तिथे नवीन बांधकाम केले जात होते. पण त्यात अधिक बांधकाम केले जात होते. नंतर जिथे मोकळी जागा असेल ती ताब्यात घेऊन तिथेही बिल्डिंग बांधायला सुरुवात केली. पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये दाऊदच्या विरोधात कारवाई करणे अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हते. याला कारण दबाव होता, अधिकाऱ्यांना पैसे मिळायचे. कधी दहशत माजवून, बंदुकीचा धाक दाखवून अशा कारवाया थांबवल्या जायच्या. माझी जेव्हा या कामासाठी बदली केली तेव्हा अशा गँगचे लोकं बांधकाम करतात आणि ते विकून मोकळे होतात. त्यामुळे बांधकाम पाडल्यानंतर त्याचा फटका गँगला न बसता ते विकत घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. त्यानंतर मी जवळपास 400 अनधिकृत बांधकामे शोधून ती बांधकामे सुरु असतानाच त्यावर कारवाई करणे सुरु केली. पण पोलीस बंदोबस्त मिळताना झालेल्या दिरंगाईमुळे त्यातील 28 ते 29 बांधकामेच मी तोडू शकलो.

याच कारवाईने दाऊद पुरता हादरुन गेला. 1993 च्या बॉम्बस्फोटांनंतर एका बाजूला पोलिसांचा ससेमिरा आणि दुसऱ्या बाजूला अवैध बांधकामांवरील हातोडा. दाऊदला मुंबईत राहणे कठीण झाले. तो दुबईमार्गे पाकिस्तानला पळून गेला.

इकडे खैरनार यांच्या कारवाईचा वेग वाढला असतानाच त्यांना कारवाई करण्यासाठी आवश्यक पोलीस बळ उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होऊ लागली, कालांतराने टाळाटाळ होऊ लागली. यामागे काही नेते असावेत असे त्यांना वाटत होते. राजकारणी-गुंड यांचे साटेलोटे मनाला अस्वस्थ करत होते. यातूनच त्यांनी थेट तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी पंगा घेतला. “पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे आहेत, दक्षिण मुंबईतील काही भागात पवारांच्या निवडणूक सभा दाऊदने प्रायोजित केल्या होत्या, दाऊदने माझी कारवाई थांबविण्यासाठी शरद पवारांना पंचेचाळीस कोटी रुपये देऊ केले, असे एकापाठोपाठ एक मोठं मोठे आरोप खैरनार यांनी केले. पवार यांनी आरोप फेटाळले आणि त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही.

पण खैरनार यांनी केलेल्या आरोपांचा शिवसेना-भाजप युतीने 1995 च्या निवडणुकांमध्ये पुरेपूर उपयोग करून घेतला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महायुतीचे सरकार सत्तेत आले. पण शेवटी व्हायचे तेच झाले,”सच्चे ऑफीसर की मौत होती है या फिर ट्रान्सफर”.सत्तेत येताच युती सरकारने खैरनार यांच्यावर अधिकाराचा गैरवापर आणि बेछूट विधाने केल्याबद्दल कारवाई केली. त्यांना निलंबित करण्यात आले. ज्या खैरनार यांच्या आरोपांचा फायदा घेत युतीने रान उठवले आणि त्यांची सत्ता आली, त्यांनीच खैरनार यांना साथ दिली नाही. कोर्टात केस चालली, निर्णय खैरनार यांच्या बाजूने आला. पण त्यानंतरही त्यांना रुजू करून घेतले नाही. 1996 ते 2000 असे पाच वर्ष ते निलंबित होते. अखेरीस 2000 साली विलासराव देशमुख यांच्या सरकारने त्यांना पुन्हा रुजू करुन घेतले, पण नोकरी सहा महिनेच शिल्लक राहिली होती. त्या सहा महिन्यातही त्यांचा हातोडा चालूच राहिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube