मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणुकीची चुरस वाढली, निवडणुकीचं वातावरण तापलं
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आगामी सीनेट निवडणुकीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केलीय. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. त्यामुळं आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी अमित ठाकरे पुढे सरसावले आहेत.
आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यंदाची सीनेट निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांमध्ये चुरस वाढली आहे. सिनेट निवडणुकीत सुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
मागच्या पदवीधर सिनेट निवडणुकीत युवासेनेनं 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवल्याचं पाहायला मिळालं होतं. आता मात्र युवासेना सुद्धा दोन गटात विभागली आहे. त्यामुळं पदवीधर सिनेट निवडणुकीत 10 पैकी 2 माजी सिनेट सदस्य हे शिंदे गटात आहेत. येणाऱ्या सिनेट निवडणुका पाहता सर्व पक्षांनी संघटनांनी आपली तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. मतदार नोंदणी जास्तीत जास्त होण्यासाठी भर दिला जात असल्याचं दिसून येतंय.
ठाकरेंची युवा सेना सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागांवर उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडं शिंदे गटाच्या युवा सेनेनं आपली रणनीती अजूनही गुलदस्त्यात ठेवलीय. शिवाय या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस, छात्र भारती हे समविचारी पक्षाची साथ देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं या सिनेट निवडणुकीची चुरस आणखी वाढलेली पाहायला मिळतंय. भाजप आणि मनसेच्या विद्यार्थी संघटनेची ताकद मोठी आहे.