Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच ! हायकोर्ट म्हणाले…
मुंबई : नवाब मलिकांच्या (Nawab Malik ) जामिनावर तातडीनं सुनावणी हवी असल्यास ते खरंच आजारी आहेत हे आधी आम्हाला पटवून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. अन्यथा तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण तुमच्या अगोदर आलेली बरीच प्रकरण अद्याप प्रलंबित आहेत, अशी स्पष्ट भूमिका न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी व्यक्त केली. नवाब मलिकांच्या जामीन अर्जाला ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी जोरदार विरोध केला.
नवाब मलिक हे पीएमएलए कायद्यातील कलम ४५ मधील तरतुदीनुसार आजारी नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. यावर हायकोर्टानं नवाब मलिकांच्या जामीनावर सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करत २१ फेब्रुवारीच्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना केवळ मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तीवाद करण्याचे निर्देश दिले.
सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं आहे की, नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली आहे आणि ते सध्या एकाच किडनीवर आहेत. मात्र तरीही ईडी त्यांच्या रूग्णालयातील डिस्चार्जसाठी घाई करत आहे, असा दावा त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला होता. नवाब मलिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये दाखल आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटकरिता त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत, अशी माहिती त्यांनी हायकोर्टाला दिली. तसेच न्यायमूर्ती कर्णिक यांनी अनिल देशमुखांना याच धर्तीवर जामीन दिल्याचा दाखला दिला. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनुसार नवाब मलिकांची सरकारी वकिलांकडून चाचणी पूर्ण झाली आहे. तो अहवाल कोर्टात प्रलंबित आहे, त्यावर विशेष कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं मलिक यांचा अर्ज नुकताच फेटाळून लावल्याने त्या निर्णयाला मलिकांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यावर मंगळवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सुनावणी झाली. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’नं कारवाई करत मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी दिवशी अटक करण्यात आली होती.