पुणे भाजपात फूट, शहराध्यक्षपदावरून मुळीकांना बदला अन्यथा पालिका निवडणूक अवघड

पुणे भाजपात फूट, शहराध्यक्षपदावरून मुळीकांना बदला अन्यथा पालिका निवडणूक अवघड

पुणे : महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मोठा जोर लावला आहे. मात्र, शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे डोकेदुखी वाढताना दिसत आहे. आगामी पालिका निवडणूक जिंकायची असल्यास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदला आणि त्यांच्या जागी आमदार सिद्धार्थ शिरोळे किंवा मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करा, अशी मागणी भाजपचेच माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी केली आहे. यामुळे शहर भाजपमध्ये काही अलबेल नाही, असे हे स्पष्ट चित्र दिसत आहे.

पुणे भाजपमध्ये गटबाजी किंवा वाद काही नवीन नाही. पूर्वी मुंडे गट आणि गडकरी गट,अशी गटबाजी चालायची. त्यावेळी देखील शहराध्यक्षपदावरूनच विकास मठकरी आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यातील फूट बघायला मिळाली होती.

दरम्यान मधल्या काळात देखील पुणे शहराचे नेतृत्व नेमकं कुणी करायचं यावरून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये शीत युद्ध सुरू होते. तसेच शहरातील इतर भागातही भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये एक सूत्रता दिसत नाही. त्यांचे अधून मधून खटके उडालेले आपल्याला पाहायला मिळतात.

दरम्यान, उज्वल केसकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीबद्दल नव्याने सांगायची गरज उरली नाही. केसकर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, पुणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात बदल करणे आता गरजेचे आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे अथवा प्रदेश सरचिटणीस मुरली मोहोळ यांना अध्यक्ष केले पाहिजे.

नेतृत्व बदल झाला नाही तर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे अवघड आहे. जगदीश मुळीक यांना खासदारकी द्या आणि पुनर्वसन करा. पण शहराध्यक्ष पद त्वरित बदलले पाहिजे. सिद्धार्थ शिरोळे हा योग्य उमेदवार आहे असे मत केसकर यांनी व्यक्त केले आहे. यावर आता पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube