धक्कादायक! येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा एकाच दिवशी मृत्यू; कुटुंबीयांना संशय

धक्कादायक! येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा एकाच दिवशी मृत्यू; कुटुंबीयांना संशय

पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैदेत असलेल्या तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मृत झालेल्या कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद ही पोलिसांनी अकस्मात म्हणून केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे मृत कैद्याच्या कुटुंबीयांनी कारागृह प्रशासनावर संशय व्यक्त केलाय.

मृत कैद्यांमध्ये शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा), संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) अशी मृत कैद्यांची नावे आहेत.

दरम्यान, संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये तो येरवडा कारागृहात आहे. दरम्यानच्या काळात त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. मात्र, 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. यानंतर मृत संदेशच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी कारागृह प्रशासनास जबाबदार धरले आणि संशय व्यक्त केला. त्यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू ‘लिव्हर सोरायसिस’ या आजाराने झाल्याचे स्पष्ट केले.

दुसऱ्या दोन कैद्यांमध्ये शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ हे दोन्ही कैदी वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यातुनच त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे येरवडा कारागृह प्रशासनाने संबंधित मृत कैद्यांच्या कुटुंबीयांना कळवले असून याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की, येरवडा कारागृहात असलेल्या गोंडेकर, शेख, दाताळ या तीन कैद्यांचा शनिवारी मृत्यू झाला. या तिघांना वेगवेगळे आजार होते. या आजारपणातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, संदेश याच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत शंका होती. त्याबाबत त्यांचा आणि डॉक्टरांचा संवाद साधून दिला. त्यावेळी त्यांनी मृत्यूचे कारण सांगितले आहे. मात्र, एकाच वेळी तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. हे तिघेही एकाच बॅरेकमध्ये असल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube