विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागा सरकारने घ्यावी; आठवलेंची मागणी
पुणेः भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची 100 एकर जमीन सरकारने संपादित करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
आज आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. आपण राज्य आणि केंद्र सरकार तसेच समाजाच्या वतीने येथे अभिवादनास उपस्थित राहिलो असल्याचे आठवले म्हणाले. ऐतिहासिक विजय स्तंभ स्मारकासाठी समाजकल्याण विभाग आणि प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यासाठी आवश्यक शंभर एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा. एकदा भूसंपादन निर्णय राज्य सरकार ने घेतला की लगेच विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण निर्मूलन करता येईल. स्मारकासाठी ज्यांच्या जमिनी संपादित होतील त्यांना योग्य मोबदला देऊन योग्य पुनर्वसन करावे या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मंत्रालयातर्फे काही निधी मिळेल का याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. यावेळी भदंत राहुल बोधी महाथेरो, रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.