मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Sanjay Raut : मुंबईमध्ये येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे या बैठकीचे यजमानपद आहे. 30 ऑगस्टला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती देणार आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडियाच्या बैठकीत लोगोचे अनावरण, 140 देशवासियांपर्यंत पोहोचणार असल्याचे तसेच जागतिक स्तरांतून 38 पत्रकार येत असल्याचे सांगितले. त्यावरुन या इंडियाच्या बैठकीची उत्सुकता किती आहे? हे समजते असेही खासदार राऊत म्हणाले.
बीडसाठी बैठकांचे सत्र, सभेचे आयोजन, प्रवेशाचा सपाटा : शरद पवारांच्या सभेनंतर अजितदादा अलर्ट
खासदार संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीची फक्त देशातच नाही तर जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. जगभरातून 38 पत्रकार या बैठकीसाठी येणार आहेत. त्यांनी नोंदणीसाठी आमच्याकडे विचारणा केली असल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले. देशातील प्रमुख 28 पक्ष बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
‘इंडिया’च्या मुंबईमधील बैठकीचे यजमानपद स्वीकारलेलं आहे. 30 ऑगस्टला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या बैठकीची माहिती देणार आहेत. मुंबईच्या ग्रॅंड हयातमध्ये ही बैठक होणार आहे. याच बैठकीमध्ये ‘इंडिया’च्या आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाणार आहे. या लोगोमध्ये देश आणि देशाची एकता असणार आहे, असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
31 ऑगस्टला रात्रीची बैठक आहे आणि 1 तारखेला दिवसभर बैठक असणार आहे. त्या बैठकीचा अजेंडा तयार होत आहे. त्याच बैठकीत इंडियाचा लोगो, त्याचं अनावरण केलं जाणार आहे. त्यासंदर्भात कशी तयारी केली जाईल, त्यावर चर्चा सुरु आहे. तिन्ही पक्षांचे सोशल मीडिया एकत्र येऊन काम करत आहे, या काळामध्ये आम्ही देशातील 140 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी इंडियाच्या लोगोमध्ये काय असणार आहे? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारला त्यावर, खासदार राऊत म्हणाले की, लोगोमध्ये देशाची एकता असणार आहे. या देशाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, एकत्र राहण्यासाठी हा देश अखंड भारत, त्यासाठीची उर्जा या लोगोमध्ये असणार आहे, असेही यावेळी खासदार संजय राऊत यांनी सांगितले.