वंचित हा शिवसेना कोट्यातील पक्ष; आंबेडकरांना भूमिका मान्य होईल का?
मुंबईःप्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी-महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तिन्ही घटक पक्षांना आपले मित्र पक्ष घेण्याचा आधिकार आहे. जागा वाटप करताना त्या घटक पक्षाने आपल्या वाट्याच्या जागा मित्रपक्षाला सोडाव्यात, अस थेट विधान करत अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युतीबाबत भाष्य केलंय.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. महाआघाडीची सत्ता देखील आली होती, आता तिन्ही पक्ष विरोधी बाकावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था , विधानसभा आणि लोकसभासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र असतील असेच संकेत मिळू लागले आहेत. तीन पक्ष एकत्र असताना त्यांना सहयोगी म्हणून शेकाप, आरपीआय खरात गट व इतर छोटे पक्ष ही आहेत. आता प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेत युती होण्याच्या मार्गावर आहे. ती स्थानिक स्वराज्य संस्थापुरती मर्यादित आहे, की आगामी विधानसभा आणि लोकसभेसाठी असेल का याबाबत अजून स्पष्टता नाही. पण उद्धव ठाकरे ज्या जागा देतील त्या आम्ही लढू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
या जागा महाविकास आघाडीमधील मिळणार नाही. ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील त्याची विभागणी वंचितसोबत केली जाईल.
अजित पवार यांनी मांडलेल्या सूत्रानुसार तीन सहयोगी पक्षात जागा वाटप होईल. ज्याच्या वाटल्या ज्या जागा येतील त्यांनी आपल्या सहयोगी द्यायच्या आहेत. यानुसार वंचित हा महाआघाडीच्या घटक पक्ष जरी असला तरी तो शिवसेना कोट्यातील पक्ष असेल हे स्पष्ट झाले आहे. महाआघाडीतला मुख्य पक्षाऐवजी फक्त शिवसेनेचा कोट्यातील सहयोगी पक्ष असणे, स्वतः प्रकाश आंबेडकर यांना ही भूमिका मान्य होईल का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.