बिहार हादरलं! मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू; खिडक्या फोडून रुग्णांची सुटका

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 28

10 people killed in massive fire in Bihar : बिहारमधील मुझफ्फरपूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ब्रह्मपुरा परिसरात असलेल्या प्रसाद हॉस्पिटलला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला (ICU) मोठा फटका बसला असून प्राथमिक माहितीनुसार 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात अचानक धूर पसरल्यानंतर काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. आग मुख्यतः आयसीयू विभागात पसरल्याने तेथील रुग्ण अडकले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले. स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अनेकांनी आयसीयूच्या खिडक्या फोडून आत अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

Video : पक्षाने त्यांना काय कमी केलं होतं?, तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर लंके काय म्हणाले?

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी बचावकार्याचा आढावा घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या रुग्णांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून प्रशासनाने संपूर्ण घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी केली जात आहे. या भीषण अग्निकांडामुळे मुझफ्फरपूरसह संपूर्ण बिहारमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य आणि तपास दोन्ही युद्धपातळीवर सुरू आहेत.

follow us