लष्करी सैनिकांना रिफंड देणार, रि-बुकिंगसाठीही शुल्क नाही, सैनिकांच्या कर्तव्याला सलाम करत Air India चा निर्णय

Air India: ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती वेगाने बदलतेय. हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर, केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry has) सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द केल्यात. त्यामुळं आता रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्सप्रेसने सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला.
दोन्ही विमान कंपन्यांनी सैनिकांनी बुकींग केलेले तिकीट रद्द करावे लागत असल्याने त्यांना पूर्ण रिफंड मिळेल, अशी घोषणा केली.
Air India group is grateful for the selfless service and dedication of our military and defence personnel. In the prevailing situation, for those personnel holding defence fares who are booked on Air India and Air India Express flights till 31 May 2025, we are offering full…
— Air India (@airindia) May 7, 2025
३१ मे पर्यंत बुकिंग केल्यास मिळणार पूर्ण रिफंड…
जर एखाद्या सैनिकाने ३१ मे २०२५ पर्यंत एअर इंडिया किंवा एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांमध्ये प्रवासासाठी तिकीट बुक केले असेल आणि कर्तव्यामुळे ते रद्द करावे लागले असेल तर त्याला पूर्ण परतफेड मिळेल. त्याच वेळी, ज्या सैनिकांना त्यांची प्रवासाची तारीख बदलायची आहे, ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 30 जून 2025 पर्यंत तिकिटाची तारीख पुन्हा शेड्यूल करू शकतात, अशी माहिती एअर इंडियाने दिली.
एअर इंडियाने ट्विटरवर पोस्ट केली. त्यात म्हटलं की, सध्याच्या परिस्थितीत, आम्ही ३१ मे पर्यंत विमानांसाठी तिकिटे बुक करणाऱ्या सर्व लष्करी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याला सलाम करतो. आम्ही त्यांना परतफेड आणि रीबुकिंगची सुविधा देऊन त्यांच्या समर्पणाला पाठिंबा देऊ इच्छितो.
एअर इंडिया एक्सप्रेसनेही एक संदेश जारी करत म्हटलंय की, राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत ते लष्करी कर्मचाऱ्यांसोबत उभे आहेत.
दरम्यान, ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे 9 प्रमुख तळ उद्ध्वस्त केले आहेत. सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या अचूक ऑपरेशनमध्ये अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला.