जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडले, पोलिसांनी तंबू उखडून टाकले
Wrestlers Protest : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत नव्या संसदेचे उद्घाटन (New Parliament Building) करत होते तर दुसरीकडे जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. यावेळी नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या जंतरमंतरवरील सर्व तंबू देखील हटवले आहेत.
23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते.
आज, 28 मे रोजी, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंची येथे ‘महिला सन्मान महापंचायत’ होणार होती. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी शांततेत मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांकडून जंतरमंतरवरच पैलवानांना थांबवण्यात आले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते. यावेळी मोर्चा काढण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “राज्याभिषेक पूर्ण झाला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे.”
राज्याभिषेक पूरा हुआ – 'अहंकारी राजा' सड़कों पर कुचल रहा जनता की आवाज़! pic.twitter.com/9hbEoKZeZs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2023
याआधी विनेश फोगट यांनी महिला महापंचायतीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत एक व्हिडिओ जारी केला होता. विनेश फोगट यांनी ट्विट केले आहे.
जंतरमंतरवर लोकशाहीची खुलेआम हत्या केली जात आहे.
एकीकडे पंतप्रधानांनी लोकशाहीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले आहे.
दुसरीकडे, आमच्या लोकांची अटक सुरू आहे.
जंतर मंतर पर सरेआम लोकतंत्र की हत्या हो रही
एक तरफ़ लोकतंत्र के नये भवन का उद्घाटन किया है प्रधानमंत्री जी ने
दूसरी तरफ़ हमारे लोगों की गिरफ़्तारियाँ चालू हैं. pic.twitter.com/ry5Wv9xn5A
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 28, 2023