सनी देओलला 56 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणात दिलासा; लिलावाची नोटीस अवघ्या 24 तासांत रद्द!

सनी देओलला 56 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणात दिलासा; लिलावाची नोटीस अवघ्या 24 तासांत रद्द!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) याच्या जुहू येथील घराच्या लिलावाची नोटीस अवघ्या काही तासांमध्ये मागे घेण्यात आली आहे. 56 कोटींच्या थकीत कर्ज वसुलीसाठी ही नोटीस काढण्यात आली होती. पण तांत्रिक कारणास्तव ही नोटीस मागे घेण्यात आली असल्याच्या बँक ऑफ बडोदाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र नेमके तांत्रिक कारण कोणते याबाबतची कोणतीही माहिती बँकेने दिलेली नाही. NDTV ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (The auction notice of Bollywood actor and BJP MP Sunny Deol’s house in Juhu has been withdrawn in just a few hours)

सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशाच्या आनंदात असतानाच सनी देओलसाठी झटका देणारी बातमी धडकली होती. तब्बल 56 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी सनी देओलचे जुहू येथील सनी व्हिला घर लिलावात काढण्यासाठी बँकेने नोटीस पाठविली होती. इतकंच नाही तर याबाबत वृत्तपत्रामधूनही जाहिरात देण्यात आली होती. 51.43 कोटी रुपयांच्या बोलीपासून लिलाव सुरू केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Sunny Deol Notice

काय होते या जाहिरातमध्ये?

या जाहिरातीत कर्जदार म्हणून अजयसिंह देओल उर्फ सनी देओल असे नाव लिहिलेले होते. फक्त सनी देओलच नाही तर त्याच्या सनी साउंड या कंपनीलाही नोटीस जारी करण्यात आली होती. यामध्ये विजय धर्मेंद्र देओल आणि धर्मेंद्र देओल यांनाही गॅरेंटर म्हणून नोटीस पाठविली आहे. सनी देओलकडील कर्जाची मुद्दल आणि व्याजासहीत एकूण थकीत रक्कम 55 कोटी 99 लाख 80 हजार 766 रुपये इतकी आहे.

दरम्यान, बँकेने नोटीस मागे घेताच ‘ही तांत्रिक कारणे नेमकी कोणती’ असं म्हणतं काँग्रेसने याबाबत सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “काल दुपारी देशाला कळले की बँक ऑफ बडोदाने भाजप खासदार सनी देओल यांचे जुहू येथील निवासस्थान ई-लिलावासाठी काढले आहे, कारण त्यांनी बँकेचे 56 कोटी दिलेले नाहीत. पण आज सकाळी, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत, बँक ऑफ बडोदाने ‘तांत्रिक कारणास्तव’ लिलावाची नोटीस मागे घेतल्याचे देशाला कळले आहे. ही ‘तांत्रिक कारणे’ कोणती ठरली याचे आश्चर्य वाटते?, असही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube