1 जुलैपासून खिशाला कात्री ! काय-काय बदलणार ?
Big Changes from July 1: UPI द्वारे PF काढण्याची सुविधा, LPG दरांमधील संभाव्य बदल, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे
Big Changes from July 1: नव्या महिन्याची सुरुवात म्हणजे 1 जुलैपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होईल. यामध्ये UPI द्वारे PF काढण्याची सुविधा, LPG दरांमधील संभाव्य बदल, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
1 )आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत
नोकरी करणारे कर्मचारी तसेच ऑडिटची आवश्यकता नसलेल्या करदात्यांसाठी ITR-1 आणि ITR-2 भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. पगार, भाडे, भांडवली नफा (Capital Gains) किंवा इतर बिगर-व्यावसायिक उत्पन्न असलेल्या आणि ज्यांना ऑडिटची गरज नाही, अशा करदात्यांनी या मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.
2) एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार
1 जुलैपासून नव्या आर्थिक तिमाहीची सुरुवात होत असून एचडीएफसी बँक आपल्या Regalia Gold आणि Diners Club Privilege क्रेडिट कार्डधारकांसाठी काही नवीन नियम लागू करणार आहे. नव्या नियमानुसार, Regalia Gold कार्डधारकांना पुढील तिमाहीत मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज सुविधा मिळवण्यासाठी मागील तिमाहीत किमान ६० हजार रुपयांचा खर्च करणे आवश्यक असेल.
3) LPG, CNG आणि PNG दरांमध्ये बदल होण्याची शक्यता
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणेच 1 जुलैलाही तेल विपणन कंपन्या LPG सिलेंडर, CNG आणि PNG यांच्या दरांचा आढावा घेणार आहेत. याशिवाय एअर टर्बाइन फ्युएलचे (ATF)नवे दरही जाहीर होणार आहेत. त्याचा विमान प्रवासाच्या तिकीट दरांवर परिणाम होऊ शकतो.
4) UPI द्वारे PF काढण्याची सुविधा
1 जुलैपासून EPFO 3.0 या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून UPI वापरून PFची रक्कम काढण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. EPFसदस्यांना PFची रक्कम काढण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. काही मिनिटांतच पैसे मिळू शकणार आहेत.
5) पासपोर्ट बनवणे महागणार
परराष्ट्र मंत्रालयाने दशकभरानंतर पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ केली आहे. 36 पानांच्या नव्या किंवा पुनर्निर्मित पासपोर्टचे शुल्क 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आले आहे. तत्काळ पासपोर्ट सेवा शुल्क 3,500 रुपयांवरून 5000 रुपये करण्यात आले आहे.
60 पानांच्या जंबो पासपोर्टचे शुल्क वाढवून 6000 रुपये करण्यात आले आहे.
6) रेल्वेच्या दंडाच्या नियमांमध्ये बदल
1 जुलैपासून रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवरील दंड दुप्पट होणार आहे. विनातिकीट प्रवासाचा दंड 250 रुपयांवरून 500 रुपये केला जाणार आहे.
एखादा पुरुष महिला डब्यात प्रवास करताना आढळल्यास त्याच्यावर 2500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
7) आधार अपडेट मोफत
UIDAIने नागरिकांना मोठा दिलासा देत 1 जुलैपासून पुढील सहा महिन्यांसाठी आधार अपडेट मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी 75 रुपये शुल्क आकारले जात होते.
8) कार खरेदी करणे होणार महाग
1 जुलैपासून नवीन कार खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. टाटा मोटर्ससह अनेक आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी किमती वाढवण्याची घोषणा केलीय. किआ मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. तर टाटा मोटर्सदेखील आपल्या पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा तयारीत आहेत.