प्रेयसीला गर्भवती करून सोडू नका, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा तरुणांना सल्ला
प्रेमसंबंधात असताना तरुणांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि आधी आत्मनिर्भर व्हावे, असा सल्ला आनंदीबेन पटेल यांनी दिला आहे.
Governor Anandiben Patel’s advice to the youth : उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या प्रेमसंबंध आणि विवाहाबाबतच्या विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. प्रेमसंबंधात असताना तरुणांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि आधी आत्मनिर्भर व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रेयसीला गर्भवती केल्यानंतर तिला सोडून देणे योग्य नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
लखनौ येथील महर्षी माहिती तंत्रज्ञान विद्यापीठात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी तरुणांना प्रेमसंबंधासोबतच कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले. तुम्ही प्रेमसंबंधात असाल, तुमची प्रेयसी असेल, तर त्यात काही हरकत नाही. एखाद्या मुलीवर प्रेम करत असाल, तर तिच्याशी लग्नही करा. मात्र, तिला गर्भवती केल्यानंतर सोडून जाणे योग्य नाही. त्यामुळे तरुणांनी आधी आत्मनिर्भर व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशा आशयाचे विधान आनंदीबेन पटेल यांनी केले.
त्यांच्या या विधानामुळे प्रेमसंबंध, विवाह आणि तरुणांच्या सामाजिक जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप आणि महिलांच्या भूमिकेबाबत केलेल्या विधानांमुळे लक्ष वेधले होते. 2025 मध्ये वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या ४७ व्या दीक्षांत समारंभात बोलताना आनंदीबेन पटेल यांनी विद्यार्थिनींना लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता.
जरांगेंच्या क्लिपनंतर भाजप अन् फडणवीसांची खरी कसोटी; महाराष्ट्रात पुढे काय घडणार?
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये पडू नका. आयुष्यातील निर्णय घेताना काळजी घ्या. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहा. अशा संबंधांमधून गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना ऐकून चिंता वाटते, असे त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली होती. बलिया येथील जननायक चंद्रशेखर विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभातही त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपच्या परिणामांबाबत भाष्य केले होते. लिव्ह-इन रिलेशनशिपचे परिणाम समजून घ्यायचे असतील, तर अनाथ आश्रमांना भेट द्या, असे त्या म्हणाल्या होत्या. तेथे 15 ते 20 वर्षांच्या तरुणी आपल्या लहान मुलांसह दिसतात, असा उल्लेखही त्यांनी केला होता.
त्यांच्या या विधानांमुळे तरुणांचे संबंध, विवाहसंस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा सामाजिक दृष्टिकोन पुन्हा चर्चेत आला होता. लखनौ येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठाच्या 24 व्या दीक्षांत समारंभात आनंदीबेन पटेल यांनी महिलांच्या शिक्षण, विवाह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबतही भाष्य केले होते. प्रेमविवाहाला आपला विरोध नसल्याचे सांगत त्यांनी तरुणींनी लग्नापूर्वी आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले होते. पालकांनी नात्याला मान्यता न दिल्याने काही जोडपी घरातून पळून जाऊन लग्न करतात. परिणामी, काही मुलींचे शिक्षण सुरू असतानाच त्या गर्भवती होतात आणि त्यांना मुलांना जन्म द्यावा लागतो, असे त्यांनी म्हटले होते.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?
याच भाषणात त्यांनी स्वयंपाक आणि मातृत्वाच्या जबाबदारीचाही उल्लेख केला होता. तुम्ही शिक्षिका बना किंवा आयएएस अधिकारी बना; पण त्याआधी तुम्हाला चांगली आई बनावेच लागेल, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. लग्नानंतर काही महिला यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून स्वयंपाक करतात, असे सांगत त्यांनी मुलींना स्वयंपाकाचे कौशल्य आत्मसात करण्याचाही सल्ला दिला होता.
आनंदीबेन पटेल यांच्या ताज्या विधानातून प्रेमसंबंधांमध्ये भावनिक निर्णयांसोबतच आर्थिक स्वावलंबन आणि जबाबदारीचे भान ठेवण्याचा संदेश देण्यात आला आहे. मात्र, विवाह, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि महिलांच्या कौटुंबिक भूमिकेबाबत त्यांनी यापूर्वी केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेची पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.