पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?
Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2026; महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी आज,
Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी आज, शुक्रवार (23 ऑक्टोबर) मतदान होत आहे. राज्यातील पाच मतदारसंघांसाठी एकूण 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. महायुतीतील बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी आणि महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतींमुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जरांगेंच्या क्लिपनंतर भाजप अन् फडणवीसांची खरी कसोटी; महाराष्ट्रात पुढे काय घडणार?
पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागांत पदवीधर मतदारसंघासाठी, तर पुणे आणि अमरावती विभागांत शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने राज्यभरात 2,419 मतदान केंद्रांची व्यवस्था केली असून, एकूण 10 लाख 68 हजार 72 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात 38 उमेदवार रिंगणात
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे मंगेश वानखेडे आणि शिक्षक भारतीचे अतुल देशमुख हेही निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने या लढतीत आणखी रंगत आली आहे.
अहिल्यानगरमध्ये पत्नीच्या जुन्या प्रेमसंबंधातून तरुणाचा खून, मृतदेह कालव्यात फेकला, दोघांना अटक
या मतदारसंघात नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 44 हजार 466 मतदार आहेत. चंद्रपूरमध्ये 32 हजार 265, गोंदियात 22 हजार 176, वर्ध्यात 21 हजार 742, भंडाऱ्यात 21 हजार 349, तर गडचिरोलीत 13 हजार 608 मतदार आहेत.
मतदानासाठी विभागात 445 केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य सरकारचे 2,535 अधिकारी आणि कर्मचारी, तसेच केंद्र सरकारच्या 476 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांकडे लक्ष
पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 3 लाख 88 हजार 19 मतदार असून, मतदानासाठी 741 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात 88 हजार 202, साताऱ्यात 47 हजार 463, सोलापुरात 49 हजार 72, सांगलीत 88 हजार 70 आणि कोल्हापुरात 1 लाख 14 हजार 562 मतदार आहेत.
जरांगेंच्या क्लिपमध्ये भाजप नेत्यांचे आवाज? म्हस्केंनी घेतली तिघांची नावं, सत्य बाहेर येणार?
या मतदारसंघात एकूण 47 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही रिंगणात असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याची उत्सुकता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात 61 हजार 940 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघासाठी 310 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात 16 हजार 822, सोलापुरात 15 हजार 303, साताऱ्यात 9 हजार 454, सांगलीत 8 हजार 62 आणि कोल्हापुरात 12 हजार 299 मतदार आहेत.
या मतदारसंघात 30 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेनेचे सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यासह इतर उमेदवारांमध्ये लढत होत आहे. महायुतीतील उमेदवारी आणि पक्षीय पाठिंब्याबाबतच्या घडामोडींमुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीतही मतदान
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या कौलावर अवलंबून असेल. दुसरीकडे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे.
जरांगेंच्या क्लिपमध्ये भाजप नेत्यांचे आवाज? म्हस्केंनी घेतली तिघांची नावं, सत्य बाहेर येणार?
राज्यातील या पाचही मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 अशी आहे. मतदानानंतर मतमोजणी आणि निकालाकडे राजकीय पक्षांसह उमेदवारांचे लक्ष लागणार आहे. महायुतीतील बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी आणि महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढती यांचा निकालावर काय परिणाम होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.