PF मध्ये मोठा बदल! 1,800 रुपयांपेक्षा जास्त योगदान आता ऐच्छिक; नोकरदारांसाठी काय बदलणार?

EPFO New Rule ईपीएफओनं 1800 रुपयांवरील योगदान ऐच्छिक करुन टाकलं आहे. याचा फायदा अधिक पगार असणाऱ्यांना देखील होऊ शकतो.

  • Written By: Published:
EPFO New Rule

EPFO New Rule :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने EPF Scheme, 2026 लागू केली असून, 1952 पासून लागू असलेल्या जुन्या EPF योजनेची जागा या नव्या नियमांनी घेतली आहे. 29 जूनपासून ही योजना लागू झाली आहे. या बदलामुळे PF योगदानाचा दर बदललेला नसला, तरी किती योगदान अनिवार्य आणि किती ऐच्छिक आहे, याबाबत प्रथमच स्पष्ट नियम करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार, सध्या लागू असलेल्या 15 हजार रुपयांच्या वैधानिक वेतन मर्यादेपर्यंतच कर्मचारी आणि नियोक्त्याचे PF योगदान अनिवार्य असेल. या वेतन मर्यादेच्या 12 टक्के म्हणजे 1,800 रुपये कर्मचारी आणि तितकेच 1,800 रुपये नियोक्त्याने जमा करणे बंधनकारक राहील. त्यामुळे PF च्या योगदानाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

यापूर्वी अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष पगारावर PF कापला जात होता. काही ठिकाणी कर्मचारी आणि कंपनी परस्पर संमतीने अधिक रक्कमही PF मध्ये जमा करत होते. मात्र आता 1,800 रुपयांपेक्षा जास्त कर्मचारी योगदान ‘स्वेच्छिक’ (Voluntary) मानले जाईल, असे नव्या योजनेत स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीसाठी अधिक बचत करायची असल्यास तो पूर्वीप्रमाणेच जास्त PF भरू शकतो. मात्र त्या अतिरिक्त रकमेवर नियोक्त्याने तितकेच योगदान देणे बंधनकारक राहणार नाही. कंपनीच्या धोरणात किंवा रोजगार करारात त्याची तरतूद असेल, तरच नियोक्ता अतिरिक्त योगदान देईल.

नव्या योजनेत PF काढण्याचे नियमही अधिक सोपे

नव्या योजनेत PF काढण्याचे नियमही अधिक सोपे करण्यात आले आहेत. आजारपण, शिक्षण, विवाह, घर खरेदी किंवा बांधकाम अशा प्रमुख कारणांसाठी निधी काढण्याच्या विविध तरतुदी आता तीन प्रमुख गटांमध्ये वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदस्यांना नियम समजणे अधिक सोपे होईल. याशिवाय, EPFO ने डिजिटल सेवांवरही भर दिला आहे. ऑनलाइन क्लेम, ई-पासबुक, UAN आधारित सेवा आणि इलेक्ट्रॉनिक फाइलिंगला प्राधान्य देण्यात आले असून, PF संबंधित प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक करण्याचा उद्देश आहे.

आजारपणासाठी – कोणतीही रक्कम काढण्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नसून, शिक्षणासाठी सदस्यत्वाच्या कालावधीत 10 वेळा पैसे काढता येतील. लग्नकार्यसाठी सदस्यत्वाच्या कालावधीत 5 वेळा तसेच घर खरेदी, बांधकाम, गृहकर्ज परतफेड किंवा नूतनीकरणासाठी सदस्यत्वाच्या कालावधीत 5 वेळा PF खात्यातून कर्मचारी पैसे काढू शकणार आहे. तर, विशेष परिस्थितींमध्ये एका आर्थिक वर्षात 2 वेळा कर्मचाऱ्यांना पैसे काढता येतील. ईपीएफ सदस्यत्वाची 12 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी आणि नियोक्त्याच्या वाट्यासह एकूण ईपीएफ शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत रक्कम काढता येईल. एकंदरीत काय तर,  या नव्या योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या PF कपातीमध्ये किंवा निवृत्ती लाभांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र अनिवार्य आणि स्वेच्छिक योगदानाबाबतची संभ्रमाची स्थिती दूर होणार असून, PF व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि सुलभ होणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे?

– PF चा 12% योगदानाचा दर पूर्वीप्रमाणेच कायम आहे.
– 1,800 रुपये (15 हजार रुपयांच्या 12%) हेच सध्या अनिवार्य कर्मचारी योगदान आहे.
– यापेक्षा जास्त PF भरता येईल, पण ते स्वेच्छिक (Voluntary PF) मानले जाईल.
– अतिरिक्त PF वर कंपनीकडून तितकेच योगदान मिळेलच, असे नाही.
– रोजगार करार किंवा कंपनीचे धोरण असल्यासच नियोक्ता अतिरिक्त योगदान देईल.
– PF काढण्याचे नियम अधिक सोपे करण्यात आले आहेत.
– ऑनलाइन सेवा, ई-पासबुक आणि UAN आधारित प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहेत.
– बहुतांश कर्मचाऱ्यांच्या मासिक PF कपातीत कोणताही बदल होणार नाही पण, हा बदल प्रामुख्याने नियमांमध्ये स्पष्टता आणणारा आहे.

follow us