दिल्ली-मुंबईतील नव्हे तर, छोट्या शहरातील लोकं लग्नानंतर ‘लफडी’ करण्यात पुढे; वाचा सर्व्हे

Extra-Marital Affairs टियर-1 आणि टियर-2 शहरांतील 25 ते 50 वर्षे वयोगटातील 1,503 विवाहित व्यक्तींवर केलेल्या सर्वेक्षणात 60 टक्क्यांहून...

  • Written By: Published:
Extra-Marital Affairs

Extra-Marital Affairs : विवाहबाह्य संबंध म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर (Extra-Marital Affairs) या विषयाकडे भारतात पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी या ट्रेंडमध्ये मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसारखी महानगरे नव्हे, तर छोट्या शहरांनी आघाडी घेतली आहे. नेमकं सर्व्हेक्षणातून कोणती आकडेवारी समोर आली आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमध्ये शहरांच्या तुलनेत छोटी शहरं पुढे जाण्याची कारणं काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

‘ॲशले मॅडिसन’चा सर्व्हे नेमका काय?

विवाहबाह्य संबंधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्लोबल प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या मे 2026 मधील आकडेवारीनुसार, तामिळनाडूतील कांचीपुरम हे भारतातील सर्वाधिक नव्या साइन-अप्स असलेले शहर ठरले आहे. मंदिरे आणि कांजीवरम साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपुरमने सलग दुसऱ्या वर्षी हा मान पटकावला आहे. या यादीत कांचीपुरमनंतर कोयंबतूर, तिरुवल्लूर आणि चेन्नई या शहरांचा क्रमांक लागतोय.

भारताने घेतली मोठी झेप

Ashley Madison च्या माहितीनुसार, सदस्य नोंदणीच्या बाबतीत भारताने मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी 20 देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर होता. मात्र, यंदा भारत थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा बदल भारतीय समाजातील नातेसंबंधांबाबत बदलणारी मानसिकता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला वाढते महत्त्व दर्शवत असल्याचे कंपनीचे मत आहे.

दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरही भारतीयांची मोठी उपस्थिती

केवळ Ashley Madison नव्हे, तर विवाहबाह्य संबंधांसाठी प्रसिद्ध असलेल्या Gleeden या प्लॅटफॉर्मनेही भारतात आपल्या सदस्यसंख्येने 40 लाखांचा टप्पा ओलांडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मबद्दल भारतीयांमध्ये वाढती उत्सुकता असल्याचे दिसून येत असल्याचे समोर आले आहे.

सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष

2024 मध्ये Gleeden ने टियर-1 आणि टियर-2 शहरांतील 25 ते 50 वर्षे वयोगटातील 1,503 विवाहित व्यक्तींवर केलेल्या सर्वेक्षणात 60 टक्क्यांहून अधिक सहभागी विवाहबाह्य संबंधांबाबत खुले विचार ठेवत असल्याचे समोर आले. यात परस्पर संमतीने अनेक नातेसंबंध आणि ‘स्विंगिंग’सारख्या संकल्पनांनाही काहींचा पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नातेसंबंधांचा बदलता ट्रेंड का?

तज्ज्ञांच्या मते, भारतातील बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे हा ट्रेंड वाढत आहे. सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्समुळे नवीन लोकांशी संपर्क साधणे सहज शक्य झाले आहे. इंटरनेटचा विस्तार छोट्या शहरांपर्यंत पोहोचल्याने हा बदल अधिक वेगाने दिसत आहे. विशेषतः महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यात वाढ झाल्याने त्या स्वतःच्या भावनिक गरजा आणि वैयक्तिक निवडींना अधिक महत्त्व देत आहेत.

याशिवाय नोकरीसाठी स्थलांतर, न्यूक्लिअर कुटुंबपद्धती आणि वाढता मानसिक ताण यामुळे काही जण भावनिक आधारासाठी विवाहाबाहेरील नात्यांकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लिव्ह-इन, घटस्फोट, ओपन रिलेशनशिप यांसारख्या विषयांवरील चर्चा आता तुलनेने अधिक खुल्या होत आहेत. त्यामुळे नातेसंबंधांविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.

सर्व्हेच्या आकडेवारीकडे कसं पाहावं?

डेटिंग प्लॅटफॉर्मवरील वाढती नोंदणी म्हणजे विवाहबाह्य संबंध प्रत्यक्षात तेवढ्याच प्रमाणात वाढले आहेत, असा निष्कर्ष काढता येत नाही. ही आकडेवारी केवळ संबंधित प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या वापरकर्त्यांची आहे. तरीही, बदलती सामाजिक मानसिकता, डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि नातेसंबंधांविषयीचे बदलते दृष्टिकोन यांचा अभ्यास करण्यासाठी ही आकडेवारी महत्त्वाची मानली जात आहे.

follow us